दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केलेल्या चर्चेमध्ये वाया जाणाऱ्या लशींविषयी चिंता व्यक्त केली होती. तसेच, लसीबाबत असलेल्या संशयामुळे आणि हाताळण्याच्या अपुऱ्या ज्ञानामुळे लसीचे डोस वाया जाण्याचं प्रमाण देखील वाढल्याचं दिसून आलं आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी लोकसभेत बोलताना देशातील लसीकरणाविषयी माहिती दिली. तसेच, कुणीही लसीकरणाविषयी मनात शंका ठेऊ नका, असं आवाहन देखील त्यांनी यावेळी लोकसभेतून देशवासीयांना केलं.
करोना लसीबाबत लोकांच्या मनात असलेल्या शंकेमुळे लसींचे डोस वाया जात असल्याचं समोर आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, लसीकरणाविषयी अपुरं प्रशिक्षण आणि लसीकरणाच्या ठिकाणी नियोजनाचा अभाव या दोन प्रमुख गोष्टी लसी वाया जाण्याला कारणीभूत ठरल्या आहेत. त्यातच, सरकारकडून वारंवार माहिती आणि आवाहन केलं जात असून देखील अनेक नागरिकांच्या मनात करोना लसीकरणाविषयी अजूनही शंका असून त्यासंदर्भात आता केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनीच लोकसभेतून देशवासीयांना आवाहन केलं आहे. “देशात दिल्या जाणाऱ्या कोविड-१९ लसींबाबत कुणाच्याही मनात संशय असू नये. माझी विनंती आहे की सगळ्यांनी करोनाची लस घ्यायला हवी”, असं हर्ष वर्धन म्हणाले आहेत.
No one should have any doubts about the COVID19 vaccines. I urge all to take the vaccine shots: Union Health Minister Dr Harsh Vardhan in Lok Sabha pic.twitter.com/9KWc4JiLrQ
— ANI (@ANI) March 19, 2021
केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात आत्तापर्यंत ३ कोटी ३९ लाख नागरिकांना करोनाची लस देण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातील करोना योद्धे, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, पंतप्रधान, राज्यांचे मुख्यमंत्री, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील सहव्याधीग्रस्त नागरिक यांचा समावेश आहे. देशातील करोनाबाधितांची आकडेवारी या काळात पुन्हा वाढू लागली असून गुरुवारी दिवसभरात देशात एकूण ३९ हजार ७२६ नवे करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. गंभीर बाब म्हणजे त्यातले तब्बल २५ हजार ८३३ रुग्ण एकट्या महाराष्ट्रात सापडले आहेत.
BMCचा प्लान! निगेटिव्ह रिपोर्ट दाखवा नाहीतर, स्वॅब द्या; मॉलमध्ये प्रवेशाआधी चाचणी सक्तीची