पीटीआय, नवी दिल्ली
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे नुकत्याच पार पडलेल्या महाकुंभादरम्यान नद्यांचे पाणी स्नान करण्यायोग्य होते असे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) राष्ट्रीय हरित लवादाला (एनजीटी) सांगितले आहे. यापूर्वी ‘सीपीसीबी’च्या अहवालात गंगा व यमुना नद्यांच्या पाण्यात मानवी विष्ठेतील जीवाणू उच्च प्रमाणात आढळल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, सांख्यिकी विश्लेषणानुसार संगमाचे पाणी स्नान करण्यासाठी योग्य होते असे नवीन अहवालात म्हटले आहे.
नद्यांच्या पाण्यांच्या नमुन्यांमध्ये विविधता असल्यामुळे सांख्यिकी विश्लेषण करण्यात आल्याचे ‘सीपीसीबी’ने म्हटले आहे. हे नमुने वेगवेगळ्या तारखांना समान स्थानांवरून आणि एकाच दिवशी विविध स्थानांवरून अशा भिन्न पद्धतींनी घेण्यात आले होते. त्यामुळे त्यामध्ये नदीच्या पाण्याची एकंदर गुणवत्ता प्रतिबंबित झाली नव्हती असा दावा नवीन अहवालात करण्यात आला आहे. ‘सीपीसीबी’ने हा अहवाल २८ फेब्रुवारीला तयार केला आहे.
पक्षाचे पदाधिकारी कुंभला गेले होते. गधड्यांनो पाप कशाला करता? बाळा नांदगावकर छोट्याशा कमंडलूमधून गंगेचे पाणी घेऊन आले. मी ते घेतले नाही. श्रद्धेला काही अर्थ आहे, की नाही? एकही नदी स्वच्छ नाही. नदीला माता म्हणतो. राजीव गांधी असल्यापासून गंगा स्वच्छ होणार असे सांगितले जाते. गंगा अजून काही स्वच्छ झाली नाही. या श्रद्धा आणि अंधश्रद्धेतून बाहेर या.
राज ठाकरे, मनसेप्रमुख
श्रद्धा, अंधश्रद्धेतून बाहेर पडा
पुणे/नाशिक : मनसेच्या १९व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात राज ठाकरे यांनी गंगेच्या पाण्याच्या स्वच्छतेबद्दल नाराजी व्यक्त केली. गंगेमध्ये स्नान करणे अंधश्रद्धा असल्याचेही ते म्हणाले. तर, कुंभमेळ्यात स्नानाची परंपरा शेकडो वर्षांपासून आहे. यामागे धार्मिक व वैज्ञानिक आधार असून ही अंधश्रद्धा नाही तर श्रद्धा आहे असा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला.