नवी दिल्ली, : माहिती व प्रसारण मंत्रालयाने दहा ‘यू टय़ूब’ वाहिन्यांवरील ४५ चित्रफिती हटवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यात खोटय़ा बातम्यांचा समावेश होता. तसेच द्वेष पसरवून दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी मूळ चित्रफितीत फेरफार (मॉर्फ) करण्यात आले होते.
‘यू टय़ूब’ला आक्षेपार्ह ज्या चित्रफिती हटवण्याचा आदेश देण्यात आला आहे, त्यात ‘द लाइव्ह टीव्ही’वरील १३ चित्रफितींचा समावेश आहे. याशिवाय ‘इन्किलाब लाईव्ह’ व ‘देश इंडिया लाइव्ह’चे प्रत्येकी सहा, ‘हिंद व्हॉईस’चे नऊ, ‘गेट सेट फ्लाय फॅक्ट’ व ‘फोर पीएम’चे प्रत्येकी दोन, ‘मिस्टर रिअॅक्शनवाला’चे चार आणि ‘नॅशनल अड्डा’,‘ध्रुव राठी’ आणि ‘विनय प्रताप सिंग भोपर’ या वाहिन्यांवरून प्रत्येकी एक चित्रफीत हटवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी स्पष्ट केले, की या वाहिन्या देशात धार्मिक द्वेष पसरवण्याच्या कटात सहभागी असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे भारताच्या सौहार्दपूर्ण परराष्ट्रसंबधांत बाधा येण्याचा धोका आहे. असे प्रतिबंध आणण्याची ही प्रक्रिया सातत्याने सुरू राहणार आहे. आगामी काळातही अशा आक्षेपार्ह वाहिन्या आणि संकेतस्थळांवर कारवाई केली जाईल. यापैकी काहींनी जम्मू-काश्मीर व लडाखचे काही भाग भारतीय नकाशाच्या हद्दीबाहेर दाखवले आहेत. मंत्रालयाच्या निवेदनात नमूद केले आहे, की असे चुकीचे नकाशे सार्वजनिकरीत्या प्रसृत करणे भारताच्या सार्वभौमत्व व प्रादेशिक अखंडतेसाठी हानिकारक आहे. २०२१ च्या माहिती-तंत्रज्ञानासंबंधीच्या (मार्गदर्शक तत्त्वे व ‘डिजिटल मीडिया’ आचारसंहिता) अधिनियम तरतुदींतर्गत या चित्रफिती रोखण्याचे आदेश २३ सप्टेंबरला देण्यात आले. या सर्व चित्रफितींना एकूण एक कोटी ३० लाख प्रेक्षकांनी पाहिल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.
कायदा-सुव्यवस्था बिघडण्याचा धोका
प्रतिबंधित केलेल्या काही चित्रफितींत दाखवण्यात आले होते, की केंद्र सरकारने विशिष्ट समाजाचा धार्मिक हक्क डावलून, संबंधितांना हिंसाचाराच्या धमक्या दिल्या आहेत. भारतात ‘गृहयुद्ध’ जाहीर केले आहे. असला आक्षेपार्ह आशय असल्याने जातीय तेढ वाढून कायदा-सुव्यवस्था बिघडण्याचा धोका होता. गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.