लोकपाल विधेयकासाठी सत्ताधारी काँग्रेस व विरोधी पक्ष भाजपची एकजूट झाली आहे.  उद्या (मंगळवारी) कोणत्याही परिस्थितीत लोकपाल विधेयक संसदेत मंजूर करवून घेण्यावर आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत उभय पक्षांचे एकमत झाले. समाजवादी व बहुजन समाज पक्षांच सदस्यांनी गोंधळ घातल्यास चर्चेविनाच लोकपालवर शिक्कामोर्तब करू, अशी ‘समजूतदार’पणाची भूमीका उभय पक्षांनी घेतली आहे. प्रत्यक्षात अण्णा हजारे यांच्या उपोषणामुळे केंद्र सरकारवर दबाव वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय सरकारी लोकपालला अण्णांनी पाठिंबा दिल्याने आम आदमी पक्ष आपोआपच तोंडघशी पडेल, असा काँग्रेसला विश्वास आहे.
राज्यसभेचे सभापती हामीद अन्सारी यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर समाजवादी व बहुजन समाज पक्षाने बहिष्कार टाकला होता. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली या बैठकीस उपस्थित होते. बैठकीनंतर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री कमलनाथ म्हणाले की, लोकपाल विधेयक  आमची प्रमुख जबाबदारी आहे. लोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपने सहकार्य  करण्याचे आश्वासन दिले आहे. सप व बसपच्या नेत्यांची समजूत काढण्याचा आम्ही प्रयत्न केला. परंतु लोकपाल विधयकाचे महत्त्व पाहता आता फारवेळ ते रेंगाळत ठेवण्यात अर्थ नाही. आवश्यकता भासल्यास चालू हिवाळी अधिवेशनाची मुदत वाढविण्याची तयारी आहे, असे ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. येत्या २० डिसेंबरला अधिवेशनाची सांगता होणार आहे.

Story img Loader