देशात मंकीपॉक्सचे दोन रुग्ण आढळून आल्यानंतर केंद्र सरकारने मंकीपॉक्सचा प्रसार रोखण्यासाठी सर्वच आंतरराष्ट्रीय विमानतळावर आरोग्य तपासणी सुरू केली आहे. आज केंद्र सरकारने याप्रकरणी एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

केंद्राकडून मार्गदर्शक सुचना जारी

मंकीपॉक्सचे दोन रुग्ण आढळून आल्यानंतर देशातील सर्वच आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहे. तसेच ‘मंकीपॉक्सच्या व्यवस्थापनासाठी केंद्राकडून मार्गदर्शक सुचनादेखील जारी करण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या नागरिकांनी आजारी व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये. तसेच मृत किंवा जिवंत वन्य प्राण्यांचा संपर्क टाळावा. बुशमीट (घुशीसारखा दिसणारा प्राणी) खाणं किंवा तयार करणं टाळावं. याशिवाय आफ्रिकेतील वन्य प्राण्यांपासून बनवलेली क्रीम अथवा लोशन यांसारखी उत्पादनं वापरू नये, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – अल्पसंख्याक असूनही हिंदूंना तसा दर्जा न मिळाल्याची ठोस उदाहरणं दाखवा – सर्वोच्च न्यायालयाची याचिकाकर्त्याकडे मागणी

देशात दोन मंकीपॉक्सचे रुग्ण

१४ जुलै रोजी केरळमध्ये मंकीपॉक्सच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली होती. संक्रमित व्यक्ती ही युएईतून भारतात दाखल झाल्याचे पुढे आले होते. तसेच त्याच्या संपर्कात ११ जण आल्याचेदेखील माहिती होती. सर्वांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. या व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सचे लक्षणे आढळून आल्याने त्याचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये तपासासाठी पाठवण्यात आले होते.

तर आज ( १८ जुलै ) केरळमधील कन्नूर जिल्ह्यात मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळून आला. तो दुबईहून भारतात परतला होता. मंकीपॉक्सची लक्षणं आढळून आल्यानंतर सोमवारी संसर्गाची पुष्टी करण्यात आली. हा रुग्ण १३ मे रोजी दुबईहून कन्नूरला परतला होता. त्यानंतर त्याच्यात मंकीपॉक्सची लक्षणं आढळून आली होती.

हेही वाचा – “शिंदे गटाची कार्यकारिणी म्हणजे कॉमेडी एक्सप्रेस सीजन २”; संजय राऊतांची टीका

ही आहेत लक्षणे

मंकीपॉक्स हा विषाणूजन्य रोग आहे. हा विषाणू हवेतून पसरत नाही. हा माणसाकडून माणसाला किंवा जनावरांकडून माणसाला स्पर्श झाल्याने पसरतो. पुरळ येणे, ताप येणे ही या आजाराची लक्षणं आहेत. साधारण २ ते ४ आठवडे हा आजार राहू शकतो. याचा मृत्यूदर १ टक्के ते १० टक्क्यांपर्यंत आहे. तसेच मंकीपॉक्सचा इंक्यूबेशन काळ ( संसर्गापासून लक्षणांपर्यंतचा काळ ) साधारणतः ७ ते १४ दिवसांचा असतो. मात्र तो ५ ते २१ दिवसांपर्यंत वाढू शकतो, असे यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC)च्या वतीने सांगण्यात आले आहे.