पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार स्थापना; काळ्या पैशाबाबत विशेष तपास पथकाकडूनही चौकशी होणार
करचोरीची आश्रयस्थाने असलेल्या ठिकाणी भारतीयांनी परदेशी कंपन्या स्थापन केल्याच्या सर्व प्रकरणांचा तपास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशांनुसार एक विशेष बहुसंस्था गट (मल्टि-एजन्सी ग्रूप) स्थापन करण्यात येत असल्याचे सरकारने सोमवारी जाहीर केले. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने पनामा पेपर्सबाबत सुरू असलेल्या तपासाचा भाग म्हणून या प्रकरणातील नावांची पहिली यादी प्रकाशित करताच ही घडामोड घडली आहे.
‘कुठल्याही शोधपत्रकारितेच्या’ माध्यमातून बाहेर आलेली माहिती स्वागतार्ह असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) तपास पथक आणि त्याचे ‘फॉरेन टॅक्स अँड टॅक्स रिसर्च डिव्हिजन’ या दोन्हींतील अधिकाऱ्यांचा या गटात समावेश राहणार असून, आर्थिक गुप्तचर विभाग (फायनान्शिअल इंटेलिजन्स युनिट) व भारतीय रिझव्र्ह बँक प्रत्येक प्रकरणात मिळणाऱ्या माहितीवर देखरेख ठेवणार असल्याचे अर्थमंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
काळ्या पैशाची निर्मिती शोधणे व तिला आळा घालणे यासाठी सरकार बांधील आहे. या संदर्भात पनामा पेपर्स उघडकीला आल्यामुळे सरकारला हे उद्दिष्ट साध्य करण्यात मदतच होणार आहे. या तपास प्रक्रियेत मदत करण्यासाठी विदेशी सरकारांसह सर्व स्रोतांकडून जास्तीत जास्त माहिती मिळवण्याकरिता सरकार आवश्यक ती सर्व कार्यवाही करेल, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
जगात असे काही देश आहेत, ज्यांचा उपयोग करचोरीची आश्रयस्थाने म्हणून करण्यात येतो आणि त्यामुळे जगातील इतर देशांना करांचे नुकसान सहन करावे लागते. याबाबत भारताला चिंता आहे. बेस इरोजन अँड प्रॉफिट शिफ्टिंग (बीईपीएस)च्या ताज्या उपक्रमामुळे अशा करचोरीच्या निवाऱ्यांच्या माध्यमातून कराची चोरी करण्याच्या पद्धतीवर नियंत्रण ठेवणे भारतासह इतर देशांना शक्य होईल. बीईपीएसच्या या उपक्रमाशी भारतही पूर्णपणे बांधील आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.
‘मोझॅक फॉन्सेका’ या कायदा सल्लागार कंपनीच्या गुप्त फाइल्समधील ही ११ दशलक्ष कागदपत्रे आहेत. जगभरातील श्रीमंत लोकांना कर चुकवणे सोयीचे जावे यासाठी अक्षरश: एखाद्या कारखान्याप्रमाणे परदेशी कंपन्या तयार करण्यासाठी ही कंपनी ओळखली जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा