गांधीनगर : येथे सुरू असलेल्या संरक्षण प्रदर्शनामध्ये (डिफेन्स एक्स्पो २०२२) आतापर्यंत तब्बल १.५३ लाख कोटी रुपयांचे ४५१ करार करण्यात आले. यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात २०२५पर्यंत संरक्षण साहित्यातील निर्यात ५ अब्ज डॉलपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.
येथील महात्मा मंदिर केंद्रामध्ये संरक्षणविषयक साहित्य आणि सेवांचे १२वे प्रदर्शन भरले आहे. यात देशविदेशातील अनेक कंपन्या सहभागी झाल्या आहेत. आतापर्यंत प्रदर्शनाला हजारो व्यावसायिक प्रतिनिधींनी भेटी दिल्या असून यात झालेल्या व्यवहारांनी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत. त्यामुळे हे आजवरचे सर्वात यशस्वी प्रदर्शन ठरल्याचे संरक्षण सचिव अजय कुमार यांनी म्हटले.
निर्यातीमुळेच देशातील संरक्षण उद्योगाला खऱ्या अर्थाने चालना मिळेल, असे संरक्षणमंत्री म्हणाले. ‘अमेरिका-भारत संरक्षण सहकार्यातील नवी आघाडी : नव्या पिढीचे तंत्रज्ञान, संशोधन आणि मेक इन इंडिया’ या परिसंवादात ते बोलत होते. २०२५ पर्यंत या क्षेत्रामध्ये २२ अब्ज डॉलर्सची उलाढाला आणि त्यातील ५ अब्ज डॉलर्सची निर्यात करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले असल्याचे ते म्हणाले. केवळ देशांतर्गत मागणीमुळे अनेकदा नफ्याचे गणित जमवता येणे अवघड असल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले. अमेरिकेतील शस्त्रास्त्र कंपन्यांनी भारतात निर्मितीसाठी यावे, असे आमंत्रणही त्यांनी यानिमित्ताने दिले.