नवी दिल्ली : देशातील करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी, जगभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे राज्यांनी आत्तापासून करोना नियंत्रणासाठी समूह दक्षतेवर भर दिला पाहिजे. तसेच, अधिकाधिक लोकांना वर्धक मात्रा देण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, अशा सूचना केंद्राने दिल्या असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत निवेदनाद्वारे दिली.
चीनमध्ये मोठय़ा प्रमाणावर प्रादुर्भाव झालेल्या ओमायक्रॉनच्या ‘बीएफ-७’ या उत्परिवर्तित विषाणूचे तीन रुग्ण भारतातही आढळले आहेत. करोनाच्या संभाव्य प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकार दक्ष झाले असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी उच्चस्तरीय बैठकही घेतली होती. या बैठकीत घेतलेल्या करोनाविषयक परिस्थितीच्या आढाव्यावर आधारित मंडाविया यांनी गुरुवारी संसदेत निवेदन सादर केले.
नव्या उत्परिवर्तित विषाणूच्या संसर्गाची व्याप्ती लक्षात येण्यासाठी अधिकाधिक करोना रुग्णांच्या नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्याचा सल्लाही राज्यांना देण्यात आला आहे. राज्यांनीही समूह सर्वेक्षणावर लक्ष केंद्रित करावे व गरजेनुसार आवश्यक नियंत्रणात्मक उपाय अमलात आणावेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. नववर्षांच्या स्वागतासाठी देशभर होणाऱ्या कार्यक्रमांमुळे तसेच, सणासुदीच्या दिवसांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची दक्षता राज्यांना घ्यावी लागणार आहे. मुखपट्टी वापरणे, योग्य शारीरिक अंतर ठेवणे, वारंवार हात निर्जंतूक करणे, अन्य शारीरिक स्वच्छता ठेवणे यासाठी लोकांना सातत्याने प्रवृत्त केले पाहिजे, अशी सूचनाही राज्यांना करण्यात आल्याची माहिती मंडाविया यांनी दिली.
जगभरात प्रतिदिन सरासरी ५ लाख ८७ हजार नव्या करोना रुग्णांची नोंद होत आहे. जपान, अमेरिका, दक्षिण कोरिया, फ्रान्स, ग्रीस, इटली आणि चीनमध्ये करोनाचे रुग्ण झपाटय़ाने वाढत आहेत. भारतात अजून परिस्थिती नियंत्रणात असून प्रतिदिन १५३ नव्या रुग्णांची भर पडत आहे. देशभरात २२० कोटी करोना प्रतिबंधक लसमात्रा देण्यात आल्या असून ९० टक्के पात्र नागरिकांचे लसीकरण झाले आहे. २२.३५ कोटी लोकांनी वर्धक मात्राही घेतलेली आहे, असे मंडाविया यांनी सांगितले.
विमानतळांवर सतर्कता
परदेशातून येणाऱ्या सर्व नागरिकांची करोना चाचणी बंधनकारक करण्याचे संकेत मंडाविया यांनी दिले. सध्या २ टक्के प्रवाशांची स्वैरपद्धतीने चाचणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात या चाचण्यांचे प्रमाण वाढविले जाऊ शकेल आणि गरज पडल्यास सर्वाचीच चाचणी केली जाईल, असे मंडाविया यांनी स्पष्ट केले.
भाजपची जनआक्रोश यात्रा स्थगित
जागतिक स्तरावर करोना प्रादुर्भाव वाढत असल्याने भाजपने राजस्थानमधील आपली ‘जनआक्रोश यात्रा’ स्थगित केली. पक्षाचे सरचिटणीस अरुण सिंग यांनी गुरुवारी ही माहिती दिली. मात्र भाजपचे राजस्थान प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी यात्रा जरी स्थगित केल्या जाणार असली तरी जनआक्रोश सभा नियोजनानुसार होणार असल्याचे स्पष्ट केले. पुनिया यांनी बुधवारी एका ‘ट्वीट’ संदेशात कोविड प्रतिबंधासाठीची खबरदारी व सूचना लक्षात घेऊन पक्षाची जनआक्रोश यात्रा स्थगित केल्याचे जाहीर केले होते. केंद्र व राज्याने अद्यापही करोना प्रतिबंधक मार्गदर्शक तत्त्वे व नियमावली प्रसृत न केल्याने यात्रा स्थगितीबाबत काहीसा गोंधळ उडाला होता. परंतु पूर्वनियोजनानुसार आमच्या जाहीर सभा होणार आहेत. सभेत करोना प्रतिबंधक उपाय व नियमांचे पालन केले जाईल.
राज्यांची पावले..
* कर्नाटक : राज्य सरकारने इन्फ्लूएंझासारखा आजार आणि तीव्र श्वसन आजार असल्यास करोना चाचणी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकार चाचण्यांची संख्या वाढवणार असून करोनाच्या नवीन प्रकारणांचे नमून जनुकीय क्रमधारणांसाठी पाठवणार आहेत.
* उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी करोना लशीची वर्घक मात्रा देण्याचे आदेश दिले. त्यासाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यास सांगितले.
* हरियाणा : नागरिकांनी स्वच्छेने नियमांचे पालन करण्याचे आदेश आरोग्यमंत्री अनिल विज यांनी दिले. गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टी घालणे, सॅनिटायझरचा वापर करणे या खबरदारीच्या उपयांचे स्वेच्छेने पालन करण्याची सूचना.
* पंजाब : मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. काही देशांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने करोनासंबंधी परिस्थितीवर चर्चा.
* आंध्र प्रदेश : करोनाबाधितांच्या संख्येत अधिक वाढ झाल्यास कोणतीही परिस्थिती हाताळण्यास तयार. राज्यात पुरेसे मनुष्यबळ, रुग्णशय्या, औषधे आणि ऑक्सिजन सिलिंडर असल्याचे राज्य सरकारने सांगितले.
देशात गुरुवारी १८५ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ३,४०२ आहे.
‘भारत जोडो यात्रा’ रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न!
नूह (हरियाणा) : ‘भारत जोडो यात्रा’ रोखण्यासाठी सरकार निमित्त शोधत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केला. चीनसह काही देशांत करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून करोना प्रतिबंधक नियमांचे पालन शक्य नसेल तर भारत जोडो यात्रा स्थगित करण्याचे आवाहन केले होते.