केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अख्यारित असलेल्या इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (१४ सी) ने गुरुवारी सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांतील सरकारांना एक महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे. इंडोनेशियातील काही हॅकर ग्रुप भारतातील जवळपास १२ हजार सरकारी वेबसाईट्सवर सायबर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सर्व राज्य आणि केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर तांत्रिक लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मनीकंट्रोलने यांसदर्भातील वृत्त दिले आहे.
राज्य आणि केंद्र सरकारची अनेक संकेतस्थळे हॅकर्सकडून लक्ष्य करण्यात आली आहेत. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी प्रतिबंधात्मक पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या काळात कोणत्याही संकेतस्थळावर हल्ला होणार नाही यासाठी दक्ष राहण्यास सांगण्यात आले आहे.
हेही वाचा >> करोनामुळे देशभरात एका दिवसांत २० मृत्यू, नव्या रुग्णांचा आकडाही ११ हजार पार; सक्रिय रुग्ण किती?
सरकारी कर्मचाऱ्यांना सूचना
अनोळखी क्रमांक किंवा इमेलमधून आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा लिंकवर क्लिक केल्यास सायबर अटॅक होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे संवेदनशील संकेतस्थळाची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. तसंच, सर्व सॉफ्टवेअरचे अद्ययावतीकरण सुरू आहे, अशी माहिती सायबर सुरक्षा पुरवणाऱ्या पिंगसेफ कंपनीचे संस्थापक आनंद प्रकाश यांनी दिली आहे.
याआधीही झाले आहेत सायबर हल्ले
मलेशिअन हॅकर्सने गेल्यावर्षी भारतीय संकेतस्थळांना लक्ष्य केलं होतं. भाजपाच्या तत्कालीन प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून आखाती देशांनी भारताविरोधात संताप व्यक्त केला होता. त्याचाच परिणाम म्हणून मलेशिअन हॅकर्सने भारताच्या सरकारी संकेतस्थळावर सायबर हल्ला केला. इस्रायलमधील भारतीय दूतावास आणि राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्थेचेही संकेतस्थळ मलेशिअन हॅकर ग्रुप ड्रॅगन फोर्सकडून हॅक करण्यात आले होते.
हेही वाचा >> VIDEO : भारतात पहिल्यांदाच पाण्याखालून धावली मेट्रो, अवघ्या ४५ सेकंदात पार केलं ‘इतकं’ अंतर
एम्स रुग्णालयाच्याही संकेतस्थळावर गेल्यावर्षी सायबर हल्ला करण्यात आला होता. यामुळे या रुग्णालयाची संपूर्ण यंत्रणा कोलमडली होती. गेल्या वर्षभरात एकूण १९ वेळा भारताच्या सरकारी संकेतस्थळांवर सायबर हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे आता मिळालेल्या अलर्टनुसार संबंधित सरकारी संकेतस्थळांवर अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.