नवी दिल्ली : देशाच्या संरक्षण दलप्रमुखांच्या नियुक्ती नियमात बदल करण्यात आला आह़े  नव्या बदलानुसार, लष्कर, नौदल आणि वायुदलाच्या सेवारत (विद्यमान) प्रमुखांसह ६२ वर्षांखालील विद्यमान किंवा निवृत्त लेफ्टनंट जनरल, एअर मार्शल आणि व्हाईस अ‍ॅडमिरल हे संरक्षण दलप्रमुख पदासाठी पात्र ठरतील़  या नियमबदलामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याचे संकेत आहेत़

तत्कालीन संरक्षण दलप्रमुख जनरल बिपीन रावत यांचे गेल्या वर्षी ८ डिसेंबरला हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल़े  तेव्हापासून संरक्षण दलप्रमुखपद रिक्त आह़े  या पदावरील नियुक्तीबाबत सरकारने सोमवारी लष्कर कायदा, नौदल कायदा आणि वायुदल कायद्यातील तरतुदींच्या अनुषंगाने वेगवेगळय़ा अधिसूचना प्रसृत केल्या़  त्यानुसार सेवारत किंवा निवृत्त लेफ्टनंट जनरल, एअर मार्शल आणि व्हाईस अ‍ॅडमिरल हे संरक्षण दलप्रमुखपदासाठी पात्र ठरतील़

‘‘केंद्र सरकारला आवश्यकता भासल्यास, जनहिताच्या दृष्टीने सेवारत एअर मार्शल, एअर चीफ मार्शल किंवा एअर मार्शल, एअर चीफ मार्शलच्या समकक्ष पदावरून सेवानिवृत्त झालेल्या ६२ वर्षांच्या आतील अधिकाऱ्याची संरक्षण दलप्रमुखपदी निवड करू शकेल’’, असे वायुदल कायदा १९५० नुसार प्रसृत अधिसूचनेत म्हटले आह़े  लष्कर कायदा १९५० आणि नौदल कायदा १९५७ नुसारही अशाच अधिसूचना प्रसृत करण्यात आल्या़

सरकारला आवश्यकता भासल्यास, संरक्षण दलप्रमुखांच्या सेवेला मुदतवाढ मिळेल़  मात्र, कमाल ६५ वयोमर्यादेपर्यंत सरकार मुदतवाढ देऊ शकेल, असे या अधिसूचनांमध्ये स्पष्ट करण्यात आले आह़े

देशाचे पहिले संरक्षण दलप्रमुख म्हणून जनरल बिपीन रावत यांची ३१ डिसेंबर २०१९ रोजी नियुक्ती करण्यात आली होती़  त्यांचा कार्यकाल चालू वर्षांअखेपर्यंत होता़  लष्कर, नौदल आणि वायुदलामध्ये एकवाक्यता आणण्याच्या दृष्टीने संरक्षण दलप्रमुख हे पद निर्माण करण्यात आल़े  तिन्ही दलांसाठीची शस्त्र-साहित्य खरेदी, प्रशिक्षण आणि कारवायांमध्ये सुसूत्रता आणणे हा हेतू त्यामागे होता़ 

कारगिल युद्धानंतर भारताच्या सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यासाठी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने संरक्षण दलप्रमुख पद तयार करण्याची शिफारस केली होती़  संरक्षण मंत्र्यांना लष्करी सल्ला देणे हे मुख्यत्वे संरक्षण दलप्रमुखांचे कार्य असावे, असे समितीने म्हटले होत़े

जनरल नरवणे संधीपासून वंचित

लष्करप्रमुख, नौदलप्रमुख आणि वायुदलप्रमुखांचा कार्यकाळ कमाल तीन वर्षांचा असून, त्याआधीच त्यांचे वय ६२ वर्षे पूर्ण होत असेल तर त्यांची सेवा समाप्त होत़े  म्हणजेच लष्कर, नौदल आणि वायुदलाचे प्रमुख वयोमानानुसार ६२ व्या वर्षी सेवानिवृत्त झाल्यास ते संरक्षण दलप्रमुखपदासाठी पात्र ठरू शकणार नाहीत़  कारण, ६२ वर्षांखालील वयोमान हा संरक्षण दलप्रमुखपदासाठीचा एक निकष आह़े त्यामुळे नियत वयोमानानुसार ६२ व्या वर्षी एप्रिलमध्ये लष्करप्रमुख पदावरून निवृत्त झालेले जनरल एम़ एम़ नरवणे हे संरक्षण दलप्रमुखपदाच्या संधीपासून वंचित राहिले आहेत़  रावत यांच्यानंतर जनरल नरवणे हेच संरक्षण दलप्रमुखपदाचे दावेदार ठरतील, अशी चर्चा होती़

नवे संरक्षण दलप्रमुख कोण?

जनरल बिपीन रावत यांच्या निधनानंतर गेल्या सहा महिन्यांपासून संरक्षण दलप्रमुख पद रिक्त आह़े  नुकतेच निवृत्त झालेले जनरल एम़  एम़  नरवणे हे नव्या नियमामुळे पात्र ठरू शकणार नाहीत़  तीन दलांच्या विद्यमान प्रमुखांपैकी एअर चीफ मार्शल व्ही़ आर चौधरी हे ज्येष्ठ आहेत़  त्यानंतर अ‍ॅडमिरल आर हरी कुमार आणि लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे असा सेवाज्येष्ठतेचा क्रम आह़े  त्यामुळे नवे संरक्षण दलप्रमुख कोण, याबाबत उत्सुकता आह़े