Centre notice to Uber and Ola over different pricing based on smartphone : रिक्षा किंवा कॅब बुक करताना तुम्ही कोणत्या प्रकारचा मोबाईल वापरता याच्या आधारावर कंपनी ग्राहकांकडून वेगवेगळे शुल्क आकारत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यानंतर आताग्राहक व्यवहार मंत्रालयाने या प्रकरणी कॅब अॅग्रीगेटर्स ओला आणि उबर यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे. यासाठी मंत्रालयाने गुरूवारी नोटीस जारी केली आहे.
कॅब बुक करणारा ग्राहक आयफोन वापरतोय की अँड्रॉइड फोन यावरूनदोन कंपन्या एकाच प्रकारच्या सेवेसाठी वेगवेगळे भाडे आकारत असल्याचा प्रकार निदर्शनास आला होता. त्यानंतर केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (CCPA) ने याची दखल घेतली आणि याप्रकरणी कारवाई केली आहे.
नोटीशीमध्ये काय म्हटलंय?
सीसीपीएने या कंपन्यांना त्यांच्या भाडे आकारण्याची पद्धत स्पष्ट करण्यास सांगितले आहे. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे फोन वापरणाऱ्यांमध्ये भेदभाव केल्याच्या आरोपावर देखील म्हणणे मांडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कंपन्यांकडून आकरल्या जाणाऱ्या भाड्यासंबंधी पारदर्शकता आणि निष्पक्षता राखली जावी यासाठी मंत्रालयाने सविस्तर उत्तराची मागणी केली आहे.
नेमका प्रकार काय आहे?
दिल्लीतील एक उद्योजकाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्ट्समधून हा मुद्दा उपस्थित केला होता. त्याने दोन्ही कंपन्यांचे अॅप वेगवेगळे डिव्हायसेस आणि बॅटरीचे प्रमाण असल्यानंतर वेगवेगळ्या किमती दाखवत असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर केंद्र सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात एका एक्स वापरकर्त्याने दोन फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये उबर अॅपमध्ये एकाच ठिकाणासाठी दोन वेगवेगळ्या किमती दाखवल्या गेल्या होत्या. यानंतर या प्रकरणाची चांगलीच चर्चा झाली होती.
उबरने दिलं होतं स्पष्टीकरण
ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर उबरने यावर उत्तर देताना सर्व आरोप फेटाळले होते. तसेच कंपनीने ग्राहक कुठल्या प्रकारचा फोन वापरतात त्यावरून भाडे ठरत नसल्याचे स्पष्ट केले होते. पीक अप पॉइंट्स, पोहचण्यासाठी लागणारा वेळ (ETA) आणि ड्रॉप ऑफ पॉइंट यामुळे भाडे वेगवेगळे दाखवत असल्याचे कंपनीने म्हटले होते. तसेच प्रवासासाठी आकारले जाणारे भाडे हे ग्राहकाचा फोन बनवणारी कंपनी कोणती आहे यावरून ते ठरत नाही असेही कंपनीने स्पष्ट केले होते.