केंद्र सरकारला रुपयाची घसरण रोखण्यात अपयश आले असून सरकारला अर्थव्यवस्थेत स्वारस्य नाही, केवळ खुर्च्या वाचवण्याची चिंता आहे असा आरोप गुजरातचे मुख्यमंत्री व भाजपचे प्रचार समिती प्रमुख नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
मोदी यांनी म्हटले आहे की, सरकारला रुपयाच्या घसरणीची व अर्थव्यवस्थेची चिंता नाही. भारतीय रुपया आज सकाळीही आणखी घसरला,  एका डॉलरमागे रुपयाची किंमत ६४ रुपये ११ पैसे झाली. डॉलरची वाढती मागणी व देशांतर्गत समभाग बाजारपेठेची काहीशी कमजोर सुरुवात यामुळे रुपयाची घसरण सुरूच असून आज तो आणखी ९८ पैशांनी घसरला. गेल्या काही काळात तो १४८ पैशांनी घसरला असून ही घसरण थांबण्याची चिन्हे नाहीत.
मोदी यांनी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करीत नसल्याबद्दल केंद्रावर टीका करताना सांगितले की, तीन महिन्यात रुपया खूपच घसरला असून सरकारने रुपया मजबूत करण्यासाठी काहीच केले नाही. जर रुपया असाच घसरत राहिला तर इतर देश भारताचा गैरफायदा घेत राहतील.
नेतृत्व दिशाहीन असल्याचे सांगून मोदी म्हणाले की, इतका गंभीर आर्थिक पेचप्रसंग येईल अशी कल्पना देशाने कधीच केली नव्हती पण जेव्हा अशा पेचप्रसंगात नेतृत्व दिशाहीन असते तेव्हा निराशा वाढत जाते. लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी सरकारने काही केले नाही. गेल्या पाच वर्षांत दर तीन महिन्यांनी केंद्र सरकार वस्तूंचे दर कमी होतील असे सांगते, चलनवाढ रोखली जाईल असे सांगते पण त्यातले काहीही घडून आले नाही.