भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील तीन दोषींच्या फाशीची शिक्षा रद्द करण्यास केंद्र सरकारने विरोध दर्शविला आहे.
या प्रकरणातील आरोपी मुरूगन, संथन आणि पेरारिवलन या तिघांनी फाशीची शिक्षा रद्द व्हावी यासाठी दया अर्ज दाखल केला होता. या तिघांच्या दया अर्जावरील सुनावणी गेल्या अकरा वर्षांपासून प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच इतर प्रकरणांमधील १५ दोषींना सुनाविण्यात आलेली फाशीची शिक्षा रद्द केली आहे. या पार्श्वभूमीवर या तिघांच्याही दया अर्जावर सर्वोच्च न्यायालय सुनावणी देण्याची चिन्हे निर्माण झाली होती. त्यामुळे याबाबत केंद्र सरकारने यास ठाम विरोध दर्शवत राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषींची फाशीची शिक्षा रद्द करणे योग्य ठरणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच या तिघांची फाशी रद्द व्हावी असे कोणतेही कारण नसल्याचे म्हणत आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवण्याची केंद्र सरकारची भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालयाने या तिघांच्या दया याचिकेवरील निकाल राखून ठेवला आहे.