राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या तीन कमांडोंना केंद्राने हटवलं आहे. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, फेब्रुवारी महिन्यात अजित डोवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी आढळल्याने केंद्राने हा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, डोवाल यांच्या व्हीआयपी सुरक्षेशी संबंधित उपमहानिरीक्षक (डीआयजी) आणि कमांडंट यांची बदली करण्यात आली आहे.
फेब्रुवारी २०२२ मध्ये एका व्यक्तीने अजित डोवाल यांच्या निवासस्थानी घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी सुरक्षारक्षकांनी त्याला रोखलं होतं आणि नंतर दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाल रंगाच्या एसयुव्हीमधून एका व्यक्तीने कडक सुरक्षाव्यवस्था असणाऱ्या अजित डोवाल यांच्या दिल्लीमधील निवासस्थानी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता.
कार रोखण्यात आली होती आल्यानतंर अजित डोवाल यांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या सीआयएसएफने कार रोखत त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं.
या व्यक्तीचं नाव शंतनू रेड्डी होतं. आपल्या शरिरात चिप बसवलेली असून, बाहेरुन त्याद्वारे नियंत्रण केलं जात असल्याचा त्याचा दावा होता. एमआरआय चाचणी केली असता शरिरात अशी कोणतीही चिप बसवली नसल्याचं समोर आलं होतं. बंगळुरुची असणाऱ्या या व्यक्तीचं मानसिक संतुलन योग्य नव्हतं. नोएडामधून ही कार भाड्याने घेण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. अजित डोवाल यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा आहे. घटना घडली तेव्हा अजित डोवाल आपल्या निवासस्थानी होते.