झिका विषाणूचा परदेशात प्रसार सुरू असल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीची दखल केंद्र सरकारने घेतली असून त्याचा भारतात प्रादुर्भाव होऊ नये यावर देखरेख करण्यासाठी एका तांत्रिक गटाची स्थापना केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या इशाऱ्यानुसार हा विषाणू धोकादायक असून वेगाने पसरत आहे, शिवाय तो भारतासारख्या देशावर परिणाम करू शकतो.
आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी उच्चस्तरीय बैठकीत सांगितले की, झिका विषाणूमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची दखल घेण्यात आली आहे, भारत त्यासाठी सज्ज आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्रात डॉक्टरांची बैठक नड्डा यांनी घेतली. एडिस एजिप्ती डासामुळे हा झिका विषाणू पसरतो व त्यामुळे मुलांच्या मेंदूची वाढ अपुरी होते. हाच विषाणू चिकुनगुन्या व डेंग्यू या रोगांच्या विषाणूंची लागण करण्यास कारणीभूत असतो. त्यामुळे भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात झिका विषाणूचा प्रसार होण्याचा धोका आहे. त्याचा पहिला प्रसार ब्राझीलमध्ये गेल्या वर्षी झाला, त्यानंतर तो २४ देशात पसरला. झिका विषाणूमुळे मायक्रोफेली हा रोग बालकांना होतो त्यात मेंदूची अपुरी वाढ होते. आरोग्य मंत्री नड्डा यांनी आजच्या बैठकीत या विषाणूमुळे निर्माण होऊ शकणाऱ्या परिस्थितीवर विचार करण्यासाठी तांत्रिक गटाची नेमणूक केली आहे. हा गट प्रतिबंधात्मक उपाययोजनांची आखणी करेल. बाहेरून येणाऱ्या रूग्णांवर त्यासाठी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. स्वच्छ पाण्यात एडिस एजिप्ती डासांची वाढ होणार नाही याची काळजी घेण्याच्या आवश्यकतेवर नड्डा यांनी भर दिला आहे.

Story img Loader