आशिया आणि युरोपमध्ये करोना रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर केंद्र सरकारने सर्व राज्यांना अलर्ट दिला असून आपली सुरक्षा कमी करु नका अशी सूचना केली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी सर्व राज्याच्या तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या अतिरिक्त मुख्य सचिव तसंच आरोग्य सचिवांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांना पंचसूत्री धोरणावर लक्ष देण्यास सांगितलं आहे. टेस्ट, ट्रॅकिंग, उपचार, लसीकरण आणि करोनाच्या नियमांचं पालन केलं जाव अशी सूचना केंद्राने केली आहे.
केंद्राने राज्यांना कोणत्याही स्थितीत नियमांचं पालन केलं जावं असं सांगितलं असून सामाजिक तसंच आर्थिक गोष्टी सुरळीत सुरु राहाव्यात याकडेही लक्ष देण्यास सांगितलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात, नमुन्यांची वारंवार चाचणी करा जेणेकरुन करोनाच्या नव्या व्हेरियंटची वेळेत माहिती मिळेल असं सांगितं आहे. तसंच लोकांनी लसीकरण करावं यासाठी प्रयत्न करण्यासही सांगितलं आहे.
Covid 19: जगाची चिंता वाढली! करोनाचा नवा व्हेरियंट आढळला; जाणून घ्या काय आहेत लक्षणं?
“दक्षिणपूर्व आशिया आणि युरोपमधील काही देशांमध्ये करोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर १६ मार्चला आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशांनी आक्रमक आणि शाश्वत जिनोम सिव्केन्सिंग तसंच नीट लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलं,” असं भूषण यांनी पत्रात सांगितलं आहे.
करोनाच्या नव्या व्हेरियंटची माहिती मिळवण्यासाठी राजेश भूषण यांनी राज्यं आणि केंदशासित प्रदेशांना जास्तीत जास्त नमुने INSACOG नेटवर्ककडे द्यावेत असं आवाहन केलं आहे.
करोनाच्या नव्या व्हेरियंटची माहिती मिळवण्यासाठी राजेश भूषण यांनी राज्यं आणि केंदशासित प्रदेशांना जास्तीत जास्त नमुने INSACOG नेटवर्ककडे द्यावेत असं आवाहन केलं आहे. जर नवीन व्हेरियंटची वेळेत माहिती मिळाली तर त्याचा प्रसार होण्यापासून रोखता येईल असं भूषण म्हणाले आहेत.
पत्रात पुढे ते म्हणालेत की, राज्यांनी करोनाच्या नियमांचं पालन करण्यासाठी जनजागृती करण्याची गरज असून मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता यांची आठवण करुन दिली पाहिजे.
भारतामध्ये सध्या करोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत असून दिवसाला पाच हजारांपेक्षा कमी रुग्ण आढळत आहेत. शुक्रवारी सकाळी देशात २५२८ रुग्ण आढळले. यासोबत एकूण रुग्णसंख्या ४ कोटी ३० लाख ४ हजारांवर पोहोचली आहे.