नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी जम्मू-काश्मीरमधून काही लष्कर मागे घेण्याचा आणि कायदा आणि सुव्यवस्था पोलिसांवर सोपवण्याचा विचार केंद्र सरकार करीत असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी सांगितले. तसेच काश्मीरच्या काही भागांतून सशस्त्र दले विशेषाधिकार कायदा (अफ्स्पा) मागे घेण्याचे सूतोवाचही त्यांनी केले.
जम्मू-काश्मीर येथील ‘गुलिस्तान न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत शहा म्हणाले की सैन्य मागे घेण्याची तसेच कायदा व सुव्यवस्था एकटया जम्मू आणि काश्मीर पोलिसांवर सोपवण्याची केंद्राची योजना आहे. दहशतवाद्यांशी होणाऱ्या चकमकीत पोलीसही आघाडीवर असतात. त्यामुळे तेथील पोलीस दलाला आम्ही बळकट करत आहोत. जम्मू आणि काश्मीरमधील लष्कर टप्प्या-टप्प्याने बराकीकडे परतेल, अशी रचना तयार केली आहे. पुढील सात वर्षांची योजना तयार आहे. दरम्यान, आमच्यात युती झाली तेव्हा अफ्स्पा हा जुलुमी कायदा मागे घेण्याच्या मुद्दयाशी भाजपही पूर्णपणे सहमत होता, अशी प्रतिक्रिया पीडीपीच्या प्रमुख महेबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केली.