भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस आता ‘उत्तम प्रशासन दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रातील भाजपप्रणीत सरकारची ओळख एक आदर्श प्रशासक म्हणून व्हावी, या उद्देशाने हा कार्यक्रम हाती घेण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले. त्यानुसार, २५ डिसेंबर या वाजपेयींच्या जन्मदिनी भाजपचे खासदार आणि प्रशासनातील अधिकारी उत्तम कामकाजाचे प्रदर्शन करून हा दिवस सार्थ ठरवतील असे संसदीय कामकाज खात्याचे राज्यमंत्री राजीव प्रताप रूडी यांनी सांगितले.
उत्तम प्रशासनाचा संदेश जास्तीत जास्त पसरविण्यासाठी खासदारांनी केंद्रीय मंत्री अनंतकुमार आणि राजीव प्रताप रूडी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची सूचना मोदी यांनी भाजपच्या संसदीय पक्ष बैठकीत केली. याशिवाय केंद्रीय क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आखलेल्या योजनेसाठी भाजपच्या प्रत्येक खासदारांना त्यांना आवडणाऱ्या खेळाची माहिती संबंधितांकडे जमा करण्यास सांगण्यात आली. याविषयी बोलताना रूडी यांनी त्यांच्या (मोदी) मनात काहीतरी आहे. मात्र, आम्हाला त्याबद्दल नेमकी माहिती नसल्याचे सांगितले.
या पक्ष बैठकीदरम्यान पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी भाजपमध्ये अधिकाअधिक सदस्य सहभागी करून घेण्यासाठी खासदारांना प्रयत्न करण्याचे आवाहन केले. सध्या देशभरात भाजपचे चार कोटी सदस्य असून आगामी काळात दहा कोटी लोकांना सदस्य म्हणून पक्षात सामील करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर आसाममध्ये ऑनलाईन सदस्य नोंदणीचा आकडा एका दिवसात ४०००-६००० वरून ४८,९००वर गेल्याचेही शहा यांनी यावेळी सांगितले.

Story img Loader