भारतात ओमायक्रॉन विषाणू संसर्गाच्या रूग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यातील काळजीची बाब म्हणजे १० रूग्णांपैकी ९ करोना रूग्णांनी लसीचे दोन्ही डोस घेऊनही त्यांना ओमायक्रॉनचा संसर्ग झालेला समोर आलंय. यासाठी १८३ ओमायक्रॉन रूग्णांचा अभ्यास करण्यात आला. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शुक्रवारी (२४ डिसेंबर) करोनाच्या ओमयक्रॉन विषाणूच्या संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी केवळ लस पुरेशी नसल्याचं म्हटलं आहे. तसेच नागरिकांना काही गोष्टींची काळजी घेण्याचं आवाहन करत संसर्गाच्या धोक्याबाबत गंभीर इशारा देण्यात आला.
देशात सध्या १७ राज्यांमध्ये ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग पोहचला आहे. आतापर्यंत देशभरात एकूण ४१४ ओमायक्रॉन बाधित रूग्ण आढळले आहेत. यातील अनेक रूग्ण तर असेही आहेत ज्यांनी कुठेच बाहेर प्रवास केलेला नाही, तरीही त्यांना ओमायक्रॉनचा संसर्ग झालाय. सर्वाधिक ओमायक्रॉन रूग्ण महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडूत आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी यावरील अभ्यास जारी करत सांगितलं की २७ टक्के रूग्णांनी परदेशात कोणताही प्रवास केलेला नाही, त्यानंतरही त्यांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे.
ओमायक्रॉनपासून बचावासाठी लसीकरणाशिवाय कोणती काळजी घ्यावी?
केंद्र सरकारने ओमायक्रॉनच्या संसर्गाबाबतचे धोके सांगतानाच करोना विरोधी लस संरक्षणासाठी पुरेशी नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच संसर्गापासून बचावासाठी लसीकरणासोबतच नागरिकांनी सतर्क रहावं आणि मास्क घालण्याची सवय लावावी, असं सांगितलं. हेच संसर्गापासूनचे बचावाचे उपाय आहे, असंही केंद्र सरकारने नमूद केलं आहे.
भारतात एकूण ९१ टक्के लोकांना दोन्ही लसी घेऊनही ओमायक्रॉनचा संसर्ग
भारतात एकूण ओमायक्रॉन रूग्णांपैकी तब्बल ९१ टक्के रूग्णांनी करोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असताना देखील त्यांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. याशिवाय ८७ पैकी ३ रूग्णांनी तर लसीचा बुस्टर डोस घेऊनही त्यांना संसर्ग झालाय. १८३ पैकी केवळ ७ रूग्णांनी लसीचा एकही डोस घेतलेला नव्हता. दोन जणांनी लसीचा एक-एक डोस घेतला होता.