काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचा पुनरुच्चार करीत यामध्ये कोणत्याही त्रयस्थ पक्षाचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही, असे ठणकावून सांगत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सीमेवर पाकिस्तानकडून वाढलेल्या घुसखोरीच्या घटनांमागे हाफीज सईदचाच हात असल्याचे मंगळवारी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून सीमेवरील आणि नियंत्रण रेषेवरील भारतीय छावण्यांवर गोळीबार करण्यात येतो आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या दौऱयावर आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये यंदाच्यावर्षी घुसखोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने केंद्र सरकार चिंतीत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. लष्करे तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद याने काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या सीमारेषेवर येऊन पाहणी केली होती. सीमारेषेवर आणि नियंत्रणरेषेवर वाढणाऱया घुसखोरीच्या घटनांमागे हाफिज सईदचाच हात असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, गेल्यावर्षीच्या घुसखोरीच्या घटना केंद्र सरकारला चिंतेत टाकणाऱया नव्हत्या. मात्र, यावेळची परिस्थिती एकदम वेगळी आहे. सीमेपलीकडून घुसखोरीमध्ये वाढ होत असल्यामुळे आम्ही चिंतीत आहोत. घुसखोरीमध्ये यंदा इतकी वाढ का झालीये, याची चर्चा आम्ही लष्कराच्या अधिकाऱयांसोबत करीत आहोत.
यंदाच्या वर्षात आतापर्यंत पाकिस्तानकडून १३६ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. गेल्या आठ वर्षांतील हा उच्चांक आहे. सोमवारी पाकिस्तानकडून दहा ठिकाणच्या छावण्यांवर करण्यात आलेल्या गोळीबारामुळे दोन जवान जखमी झाले आहेत.
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन करण्यात येत असल्यामुळे शिंदे यांना आपल्या दौऱयात सीमेवरील कोणत्याही छावणीला भेट देता येणार नाही. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील जवानांना (सीएपीएफ) माजी सैनिकांप्रमाणे सर्व सुविधा दिल्या जातील, असेही आश्वासन शिंदे यांनी यावेळी दिले.