बंगळुरूमधील एका आर्टिफिशियल इंटेलिजेंस ( एआय ) कंपनीच्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारीने ( सीईओ ) चार वर्षाच्या मुलाचा खूप केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर महिला मृतदेह घेऊन गोव्यातून कर्नाटकाला जात होती. पण, पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. सूचना सेठ ( ३९ वर्ष ) असं अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. या हत्येप्रकरणी आता नवनवीन माहिती समोर येत आहे.

नेमकं काय घडलं?

सूचना सेठने शनिवारी ( ६ जानेवारी ) गोव्यातील कँडोलीम येथील हॉटेलमध्ये ४ वर्षीय मुलाचा खून केला. त्यानंतर मृतदेह पिशवीत भरून कर्नाटककडे जाताना चित्रदुर्ग येथे पोलिसांनी सूचना सेठला अटक केली आहे.

सूचना सेठ आणि तिच्या पतीमध्ये कडाक्याचं भांडणं होतं असे. त्यामुळे सूचना सेठने आणि पतीनं घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. पण, न्यायालयानं दर रविवारी वडिलांना मुलाला भेटण्याची परवानगी दिली होती. न्यायालयाचा हा आदेश सूचनाला पसंत पडला नव्हता. त्यातच रविवारी ( ८ जानेवारी ) वडिलांची भेट होऊ नये म्हणून सूचनाने मुलाचा खून केल्याचं सूत्रांनी ‘इंडिया टुडे’ला सांगितलं आहे.

हेही वाचा : चार वर्षांच्या मुलाच्या हत्येचा आरोप असणारी CEO सूचना सेठ कोण आहे? जाणून घ्या तिच्याविषयी

उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन व्हॅल्सन यांनी ‘इंडिया टुडे’ म्हटलं, “चौकशीत महिलेनं सांगितलं की, तिचा पतीबरोबर वाद सुरू होता. तसेच, घटस्फोटाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली होती. न्यायालयानं मुलाला वडिलांना भेटण्याचा आदेश दिल्यानं महिला तणावाखाली होती. पुढील चौकशी सुरू आहे.”

गुन्हा कसा उघडकीस आला?

सूचना सेठ यांनी सोमवारी गोव्यातील हॉटेलमधून चेक आउट केलं. त्यानंतर हॉटेलचे कर्मचारी रूम साफ करण्यासाठी गेले होते. तेव्हा, कर्मचाऱ्यांना रक्ताचे डाग आढळून आले. तसेच, सूचना सेठ मुलासह हॉटेलमध्ये आली होती. जाताना एकटीच गेल्यानं कर्मचाऱ्यांना संशय आला.

पोलीस अधीक्षक निधीन व्हॅल्सन म्हणाले, “महिलेनं हॉटेलच्या कर्मचाऱ्याला टॅक्सीची सुविधा करण्याची विनंती केली होती. कर्मचाऱ्यानं टॅक्सीपेक्षा विमानाचे तिकीट स्वस्त असल्याचं सांगितलं होतं. पण, तिनं टॅक्सीचा आग्रह धरला आणि लगेच चेक आउट केलं. त्यानंतर हॉटेलचे कर्मचारी रूम साफ करण्यासाठी गेले असता, त्यांना रक्ताचे डाग आढळून आले.”

तेव्हा हॉटेल कर्मचाऱ्यांनी स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी टॅक्सी चालकाशी संपर्क साधून सूचना सेठच्या मुलाची चौकशी केली. त्यावेळी मुलगा मित्राच्या घरी राहत असल्याचं सेठने सांगितलं. पण, पोलिसांनी तपासणी केली असता, पत्ता खोटा असल्याचं आढळून आलं.

त्यानंतर पोलिसांनी चालकाला गाडी पोलीस ठाण्यात नेण्यास सांगितलं. तिथे गाडीची तपासणी केली असता पोलिसांना मुलाचा मृतदेह पिवशीत आढळून आला. पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल करत सूचनाला अटक केली आहे.

Story img Loader