Telegram CEO Pavel Durov Arrest: टेलीग्राम मेसेजिंग ॲपचे संस्थापक आणि सीईओ पावेल दुरोव्ह यांना शनिवारी फ्रान्सच्या पॅरिसनजीक असलेल्या बॉर्गेट विमानतळावरून अटक करण्यात आली. फ्रान्समधील माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार दुरोव्ह आपल्या खासगी विमानातून फ्रान्समध्ये आले असताना पोलिसांनी त्यांना अटक वॉरंट देत ताब्यात घेतले. टेलीग्रामने कंटेट मॉडरेटरची कमतरता असल्याची चौकशी फ्रान्स पोलिसांकडून केली जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मॉडरेटरची कमतरता असल्यामुळे टेलीग्रामवर गुन्हेगारी कृत्य वाढले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान टेलीग्रामकडून अद्याप या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तसेच फ्रान्सचे गृहखाते आणि पोलिसांनीही अधिकृत टिप्पणी केलेली नाही. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने मात्र या अटकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून अटकेची कारणे उघड करण्याची मागणी केली आहे. तसेच पाश्चिमात्य देशातील स्वंयसेवी संस्थानी दुरोव्ह यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले आहे.

पावेल दुरोव्ह कोण आहेत?

३९ वर्षीय पावेल दुरोव्ह यांचा जन्म रशियात झाला. २०१३ साली त्यांनी टेलीग्रामची स्थापना केली होती. गोपनियता, एनक्रिप्शन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केल्यामुळे टेलीग्रामने अल्पावधितच चांगली लोकप्रियता मिळविली.

हे वाचा >> Telegram CEO Pavel Durov: टेलीग्राम ॲपचा मालक निघाला खरा विकी डोनर; १०० मुलांचा बाप म्हणतो, “आता सर्व मुलांना…”

२०१४ साली दुरोव्ह यांना रशियातून बाहेर पडावे लागले होते. विरोधकांच्या अकाऊंटला टेलीग्रामवरून काढून टाकावे, अशी मागणी केल्यानंतर दुरोव्ह यांनी त्यास विरोध दर्शविला होता. २०१७ साली ते दुबईत राहू लागले होते आणि २०२१ साली त्यांनी फ्रान्सचे नागरिकत्व स्वीकारले.

टेलीग्रामशी निगडित वाद

टेलीग्रामची स्थापना झाल्यापासून जगभरातील अनेक सरकारांनी ॲपवर नियंत्रण आणावे, यासाठी दबाव आणला आहे. मात्र दुरोव्ह यांनी विविध देशातील सरकारांचा दबाव झुगारून लावला. त्यामुळे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते असल्याची त्यांची प्रतिमा तयार झाली. दरम्यान गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारी कृत्यांसाठी टेलीग्रामचा वापर झाल्याचा आरोप केला जात आहे. कट्टरपंथीय आणि गुन्हेगार टेलीग्रामच्या एनक्रिप्शनशी छेडछाड करून अवैध कामे करत आहेत. त्यामुळे युरोपियन देश खासकरून फ्रान्स टेलीग्रामच्या मॉडरेशन धोरणावर टीका करत आला आहे.

युक्रेन-रशियाच्या युद्धात टेलीग्रामचाही वापर

युक्रेन आणि रशियामध्ये टेलीग्राम प्रामुख्याने अधिक प्रमाणात वापरले जाते. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि त्यांचे सरकारी अधिकारी संवादासाठी टेलीग्रामचा वापर करतात. तसेच रशियामधील सरकारी विभाग, अधिकारीही टेलीग्रामचा अधिकृतपणे वापर करतात. दोन्ही देशांत युद्ध छेडल्यानंतर या युद्धासंबंधी महत्त्वाची माहिती मिळण्याचे ठिकाण म्हणून टेलीग्रामकडे पाहिले जाते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ceo of telegram app arrested in france alleged lack of content moderation kvg