बंगळुरुची स्टार्टअप AI कंपनीची सीईओ सूचना सेठ हिच्यावर तिच्या पोटच्या चार वर्षाच्या मुलाच्या हत्येचा आरोप आहे. तिने गोव्यातील एका हॉटेलमध्ये मुलाची हत्या केल्याचा आरोप केला जातोय. सूचना सेठ ज्या खोलीत थांबली होती त्या रुममध्ये सफाई कर्मचाऱ्यांना रक्ताचे डागही आढळले होते. या डागबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सूचनाला तिच्या या कृतीचा कुठलाही पश्चाताप झालेला नाही. ६ जानेवारी या दिवशी सूचना सेठ चार वर्षांच्या मुलाला घेऊन गोव्यातल्या एका सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये गेली होती. ८ जानेवारीच्या दिवशी मुलाचा मृतदेह बॅगेत भरुन ती कर्नाटकात चालली होती. त्याचवेळी पोलिसांनी तिला अटक केली. अटक केल्यानंतर जेव्हा तिची झडती घेण्यात आली तेव्हा पोलिसांना बॅगेत चार वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळला.
हेही वाचा >> CEO Killed Son : गोवा ते बंगळुरू टॅक्सीचं भाडं ३० हजार; चालक म्हणाला, “सूचना सेठच्या हातातील बॅग उचलली तेव्हा…”
तसंच, हॉटेल कर्मचाऱ्यांना तिच्या खोलीत रक्ताचे डाग आढळले होते. याबाबत पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. सूचना सेठच्या खोलीत आढळलेले रक्ताचे डाग हे सूचना सेठचेच असल्याची माहिती गोव्याचे डीजीपी जसपाल सिंह यांनी दिली. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. सूचना सेठच्या मनगटावर जखमांच्या खुना आहेत, त्यामुळे हे रक्त सूचना सेठच्या मनगटावरील असण्याची शक्यता असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. तसंच, सुचना सेठ तपास यंत्रणांना सहकार्य करत नसल्याचं गोव्यातील पोलिसांनी म्हटलं आहे. न्यायालयाने महिलेला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून सध्या तिची चौकशी सुरू आहे.
हेही वाचा >> सीईओ सूचना सेठने मुलाची हत्या करण्याआधी पतीला केला होता ‘हा’ मेसेज, पोलीस तपासात खुलासा
सूचनाने पतीला केला होता What’s App मेसेज
सूचना सेठची चौकशी आणि या हत्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना हे समजलं आहे की सूचनाने तिच्या पतीला व्हॉट्स अॅप मेसेज केला होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सूचनाने पती व्यंकटला ६ जानेवारीला मेसेज करुन सांगितलं होतं की उद्या (७ जानेवारी) तू मुलाला भेटू शकतोस. मात्र त्यादिवशी सूचना आणि तिचा मुलगा त्या दिवशी बंगळुरुत नव्हते. त्यामुळे व्यंकट मुलाला भेटू शकला नाही. मुलाची भेट झाली नाही म्हणून व्यंकट इंडोनेशियाला गेला. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी म्हणजेच ६ जानेवारीला सूचनाने पती व्यंकटला मेसेज करुन सांगितलं की तू उद्या मुलाला भेटू शकतोस. मात्र सूचना शनिवारीच गोव्याला निघून गेली. व्यंकट आणि सूचना यांच्यात खटके उडत होते. त्यामुळे त्यांनी घटस्फोटासाठी कोर्टात अर्जही केला होता. कोर्टाने दर रविवारी व्यंकट त्याच्या मुलाला भेटू शकतो असं म्हणत रविवारी भेट घेण्यास संमती दिली होती. त्यानंतर सूचना अस्वस्थ झाली होती. या अस्वस्थेतूनच तिने तिच्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केली असं पोलिसांचं म्हणणं आहे.