एका हायप्रोफाईल हत्या प्रकरणामुळे आज संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. बंगळुरूतील एका AI स्टार्टअप कंपनीच्या सीईओने आपल्याच चार वर्षांच्या मुलाची निर्घुण हत्या केल्याचं उघड झालं आहे. या संबंधित महिलेला अटक करण्यात आली असून पतीबरोबर असलेल्या वादामुळे ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, गोवा ते बंगळुरू हा जवळपास ७०० किमीचा प्रवास तिने एका कॅबमधून केल्याचं समोर आलं आहे.
६ जानेवारी रोजी आरोपी सूचना सेठ हिने गोव्यातील कँडोलीम येथील हॉटेलमध्ये चेक इन केलं. तिथंच तिने मुलाची हत्या केली. त्यानंतर, ७ जानेवारी रोजी सकाळी तिने चेक आऊट केलं. यावेळी तिने हॉटेल स्टाफला तिच्यासाठी बंगळुरूपर्यंत टॅक्सी बूक करायला सांगितली. परंतु, टॅक्सीपेक्षा विमानाचं तिकिट स्वस्त पडेल असं कर्मचाऱ्यांनी सांगितलं. परंतु, तरीही तिने कॅब बुक करण्याची विनंती केली. त्यामुळे हॉटेल कर्मचाऱ्यांनी तिच्यासाठी कॅब बुक करून दिली. परंतु, यावेळी हॉटेल कर्मचाऱ्यांना संशय आला की, चेक इन करताना ही महिला मुलासोबत आली होती. परंतु, जाताना ती एकटीच गेली.
हेही वाचा >> AI कंपनीच्या महिला CEO नं ४ वर्षीय मुलाचा केला खून; धक्कादायक कारण आलं समोर
हत्येचा छडा कसा लागला?
महिलेने चेकआऊट केल्यानंतर हॉटेल कर्मचारी स्वच्छतेसाठी ती राहिलेल्या रुमवर गेले. परंतु, साफसफाई करताना कर्मचाऱ्यांना खोलीत रक्ताचे डाग सापडले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक संशय आला. कर्मचाऱ्यांनी लागलीच कळंगुट पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. तेव्हा हॉटेल कर्मचाऱ्यांनी स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी टॅक्सी चालकाशी संपर्क साधून सूचना सेठच्या मुलाची चौकशी केली. त्यावेळी मुलगा मित्राच्या घरी राहत असल्याचं सेठने सांगितलं. पण, पोलिसांनी तपासणी केली असता, पत्ता खोटा असल्याचं आढळून आलं.
पोलिसांना संशय बळावल्याने पोलिसांनी चालकाला गाडी कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील आयमंगला पोलीस ठाण्यात नेण्यास सांगितली. तिथे गाडीची तपासणी केली असता पोलिसांना मुलाचा मृतदेह पिवशीत आढळून आला. पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल करत सूचनाला अटक केली आहे.
हेही वाचा >> भारतीय सीईओने ४ वर्षाच्या लेकाची केली हत्या; मृतदेह बॅगेत भरून पळताना अटक; चौकशीत म्हणाली, “पती बरोबर..”
टॅक्सी चालक काय म्हणाला?
कर्नाटक पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतल्यानंतर गोवा पोलिसांचे पथक सोमवारी रात्री उशिरा चित्रदुर्गात पोहोचले. तिला ट्रान्झिट-रिमांडवर घेतल्यानंतर गोव्यात आणण्यात आले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, “टॅक्सी चालकाने बंगळुरूपर्यंतच्या प्रवासाठी तीस हजार रुपये आकारले. त्याने तिचे सामान उचलले तेव्हा त्याला सामानाची बॅग प्रंचड जड असल्याचं जाणवलं. परंतु त्याने फारसा विचार केला.” इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
दरम्यान लहान मुलाचा मृतदेह कर्नाटकातील शवागारात ठेवण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण सोमर येईल असं एसपी वलसन यांनी सांगितलं. पोलिसांनी सांगितले की, महिलेचा पती इंडोनेशियामध्ये असून त्याला चौकशीसाठी गोव्यात येण्यास सांगितले आहे.
कोण आहे आरोपी सूचना सेठ?
पोलिसांनी सांगितले की, डेटा सायंटिस्ट सेठ ही ‘द माइंडफुल एआय लॅब’ या टेक कन्सल्टन्सीची संस्थापक आणि सीईओ आहे. तिच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, सेठ एक आर्टिफिशियल इंटेलिजेंस एथिक्स एक्सपर्ट असून डेटा सायन्स आणि स्टार्टअप इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा तिला १२ वर्षांचा अनुभव आहे. प्रोफाइलमध्ये असेही म्हटले आहे की ती AI एथिक्स लिस्टमधील १०० ब्रिलियंट महिलांमधील एक होती आणि बोस्टन, मॅसॅच्युसेट्स येथील हार्वर्ड विद्यापीठातील बर्कमन क्लेन सेंटरमध्ये फेलो होती.