Marriage Called off in Bareilly : उत्तर प्रदेशातील बरेली येथे एका लग्नात नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. या नाट्यमय घडामोडीनंतर नवऱ्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आता हे लग्न कायमचं मोडलं आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
रविंद्र कुमार (२६) याचा विवाह राधा देवी (२१) या वधूसोबत रविवारी आयोजित करण्यात आला होता. पण लग्नाच्या वेळी रविंद्र कुमार विवाहस्थळी उशिरा पोहोचला. मुलीकडच्यांनी केलेल्या तक्रारीत असं म्हटलंय की, मुलाकडच्यांनी अतिरिक्त हुंडा मागितला होता. मुलीच्या वडिलांनी सांगितलं की लग्नाच्या आधीच मुलीच्या सासरच्यांना त्यांनी अडीच लाख रुपये दिले होत, तर लग्नाच्या दिवशी २ लाख रुपये दिले होते. पण त्यांना ते पुरेसे झाले नाहीत, त्यामुळे त्यांनी अतिरिक्त हुंड्याची मागणी केली. तसंच, रविंद्रला त्याच्या पसंतीच्या मुलीबरोबर लग्न करायचं होतं. त्यामुळे तो विवाहस्थळी दारू पिऊन आला आणि मुलीच्या कुटुंबियांशी हुज्जत घालू लागला.
एवढा त्रास सहन करूनही नवरीमुलगी मंडपात उभी राहिली. लग्नाचे विधी सुरू झाले. अखेर वधू आणि वर एकमेकांच्या गळ्यात वरमाळा घालणार तेवढ्यात मुलाने वधूच्या शेजारी उभ्या असलेल्या तिच्या जवळच्या मैत्रिणीच्या गळ्यात वरमाळा घातली. या घटनेमुळे संतापलेल्या राधा देवीने मुलाच्या कानशिलात लगावली आणि लग्न मोडलं.
भर लग्नमंडपात दोन्ही कुटुंबियांनी एकमेकांवर फेकल्या खुर्च्या pic.twitter.com/HcZX0jvewx
— Viral Content (@ViralConte97098) February 26, 2025
एकमेकांवर फेकल्या खुर्च्या
अचानक लग्न मोडल्याने दोन्ही कुटुंबियांमध्ये वाद सुरू झाले. हा वाद विकोपाला पोहोचून दोन्ही कुटुंबियांच्या नातेवाईकांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या. शेवटी या प्रकरणात पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी मुलाला आणि त्याच्या मित्रांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसंच, या प्रकरणी हुंडाविरोधी कायद्याअंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.