गुजरात राज्यात सन २००२ मध्ये झालेल्या जातीय दंगलींप्रकरणी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना निर्दोष सोडण्याच्या अहमदाबाद महानगर न्यायालयाच्या निर्णयास गुजरात उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय झाकिया जाफरी यांनी घेतला आहे. झाकिया जाफरी या काँग्रेसचे दिवंगत माजी संसद सदस्य एहसान जाफरी यांच्या पत्नी आहेत.
महानगर न्यायालयाने मोदी यांना या दंगलींप्रकरणी निर्दोष असल्याचे घोषित केले आहे. या निर्णयास आम्ही आव्हान दिले असून उच्च न्यायालयात त्यानुसार याचिकाही दाखल केली आहे, असे तिस्ता सेटलवाड यांनी सांगितले. या दंगलींप्रकरणी नरेंद्र मोदी आणि इतर ५९ जणांच्या विरोधात फौजदारी कटकारस्थानाचे आरोपपत्र दाखल करण्यात यावे, अशी मागणी याचिकेमध्ये करण्यात आली आहे.
महानगर दंडाधिकारी बी. जे. गणात्रा यांनी गेल्या २६ डिसेंबर रोजी झाकिया यांची याचिका फेटाळून लावली होती.