पंतप्रधान नरेंद्र मोदी देशासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत, आपल्याला कोणी त्यांचा चमचा आहे असे म्हटले तरी काही हरकत नाही, असे अभिनेते अनुपम खेर यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांचे कौतुक करणाऱ्या घोषणा मुले का देऊ शकत नाहीत, असा आश्चर्ययुक्त सवालही त्यांनी केला.
शाळेत पंतप्रधानांच्या कौतुकाच्या घोषणा आपली मुले का देऊ शकत नाहीत, आम्ही बालपणी शाळेत लालबहादूर शास्त्री यांच्या कौतुकाच्या घोषणा देत होतो, पण आता काय समस्या आहे, असे खेर म्हणाले.
मोदी हे देशासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत, त्यांनी जगात आपल्या देशाची प्रतिमा उज्ज्वल केली आहे, परंतु टीकाकार त्यांच्या प्रत्येक कामातील त्रुटीच शोधत आहेत, असेही खेर यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीवरील कार्यक्रमात सांगितले.
आपल्याला मोदी यांचा चमचा म्हटले जाते, असे विचारले असता खेर म्हणाले की, कोणाची तरी बादली म्हणून हिणविण्यापेक्षा मोदींचा चमचा म्हणून कोणी म्हटले तरी हरकत नाही.