झारखंडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून चाललेल्या प्रचंड मोठ्या राजकीय सत्तानाट्यावर अखेर गुरुवारी रात्री पडदा पडला. हेमंत सोरेन यांना ईडीनं अटक केल्यानंतर झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाविषयीच नव्हे तर सत्तेविषयीही प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. झारखंड मु्क्ती मोर्चा व काँग्रेस आघाडीच्या संख्याबळावर चर्चा होऊ लागली होती. सरकार कोसळणार असल्याचे दावे दबक्या आवाजात केले जात होते. या पार्श्वभूमीवर झारखंड मुक्ती मोर्चाकडून सर्व आमदारांना हैदराबादला नेण्याची तयारीही करण्यात आली होती. मात्र, अखेर राज्यपालांशी झालेल्या बैठकांमधून तोडगा निघाला व चंपई सोरेन यांच्या शपथविधीवर राज्यपालांनी शिक्कामोर्तब केलं. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.
हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर घडामोडी वाढल्या
हेमंत सोरेन यांना मुख्यंत्रीपदी असतानाच ईडीनं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली. सोरेन यांनी ईडीचे सर्व आरोप फेटाळून लावले असून सत्याचाच विजय होईल, अशी ठाम भूमिका सोशल मीडियावरून मांडली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांना अटक झाल्यानंतर एकीकडे सत्ताधारी आघाडीत नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर खल सुरू असतानाच दुसरीकडे विरोधी पक्षात असणाऱ्या भाजपाकडून सत्तास्थापनेसाठी प्रयत्न केले जात असल्याच्या चर्चांना उधाण आलं. या पार्श्वभूमीवर झारखंड मुक्ती मोर्चा व काँग्रेस या दोन्ही सत्ताधारी पक्षांकडून आपापल्या आमदारांना ‘सुरक्षित’ ठेवण्याचे प्रयत्न चालू झाले.
झारखंड मुक्ती मोर्चाच्या सर्व आमदारांना हैदराबादला नेण्याच्या हालचाली सुरु झाल्या. एकीकडे आमदार बचाव मोहीम चालू असताना दुसरीकडे सत्तास्थापनेसाठी प्रयत्न चालू होते. यासाठी सत्ताधारी आघाडीकडून झारखंडचे वाहतूक मंत्री चंपई सोरेन यांच्या नावाची मुख्यंत्रीपदासाठी निश्चिती करण्यात आली. मात्र, राज्यपालांसमवेत गुरुवारी दिवसभरात दोन वेळा बैठक होऊनही त्यांना सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडून निमंत्रण न आल्यामुळे सत्तापटाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा व काँग्रेसचे सर्व आमदार हैदराबादला जाण्यासाठी रांची विमातळावरही पोहोचले होते. मात्र, त्याचवेळी नेमकं हवामान खराब असल्यामुळे विमान उड्डाणांना उशीर झाला. विमानतळावरचं हवामान खराब असलं, तरी तिकडे राजभवनावर हवामान निवळू लागलं होतं.
हेमंत सोरेन यांनी बुधवारी रात्री अटकेआधी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मात्र राज्यपालांनी इतर शक्यता पडताळून पाहण्यासाठी म्हणून त्यांना सत्तास्थापनेचं आमंत्रण दिलं नव्हतं. राज्यपाल राधाकृष्णन यांची सकाळी चंपत सोरेन यांच्या नावानिशी सत्ताधारी शिष्टमंडळाने भेट घेतली. मात्र, त्यांना वाट पाहण्यास सांगण्यात आलं. संध्याकाळी पुन्हा साडेपाचच्या सुमारास हेच पुन्हा घडलं.
अखेर रात्री उशीरा निर्णय आला!
दिवसभर झारखंडच्या राजकीय वर्तुळात कमालीची अस्वस्थता निर्माण झाल्यानंतर अखेर रात्री ११ वाजेच्या सुमारास राज्यपालांनी चंपई सोरेन यांचा सत्तास्थापनेचा दावा मान्य केला आणि त्यांना शुक्रवारी शपथ घेण्यासाठी आमंत्रित केलं. आता चंपई सोरेन यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १० दिवसांचा कालावधी देण्यात आला असून त्यानंतर अधिवेशनात त्यांची बहुमत चाचणी होईल.