Champai Soren Joins BJP Shivraj Singh Chouhan : झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी आज (३० ऑगस्ट) भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. झारखंडची राजधानी रांची येथील शहीद मैदानात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान व आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांच्या उपस्थितीत चंपाई सोरेन यांनी भाजपात प्रवेश केला. झारखंड भाजपाचे संघठन प्रभारी लक्ष्मीकांत वाजपाई, भाजपा प्रदेशाध्यक्ष बाबूलाल मरांडी, माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांच्यासह पक्षातील अनेक वरिष्ठ नेते या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.
चंपाई सोरेन यांच्या या निर्णयानंतर आता झारखंडच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चंपाई सोरेन हे झारखंडचे विद्यमन मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे वडील शिबू यांचे निकटवर्तीय मानले जातात. बिहारमधून वेगळं करून झारखंड राज्याची निर्मिती करण्यासाठी झालेल्या आंदोलनात चंपाई सोरेन सहभागी होते. हेमंत सोरेन तुरुंगात असताना चंपाई सोरेन यांनी झारखंड राज्याचं मुख्यमंत्रिपद सांभाळलं होतं. मात्र, हेमंत सोरेन तुरुंगातून बाहेर पडल्यावर चंपाई सोरेन यांना राजीनामा मुख्यमंत्रिपदाचा द्यावा लागला होता.
हे ही वाचा >> Narendra Modi : “प्रायश्चित्त अटळ आहे, भ्रष्टाचाराला महाराजांनी…”, पंतप्रधान मोदींच्या माफीनंतर शरद पवार गटाचा टोला
चंपाई सोरेन भाजपात दाखल झाल्यामुळे राज्यात भाजपाची ताकद वाढली आहे. चंपाई हे शिबू सोरेन यांच्या खांद्याला खांदा लावून झारखंड आंदोलनात सहभागी झाले होते. तसेच आजवरच्या त्यांच्या राजकिर्दीमुळे राज्यातील विधानसभेच्या बहुसंख्य जागांवर त्यांचा मोठा प्रभाव आहे. कोल्हान क्षेत्रावर त्यांची मजबूत पकड आहे. राज्यात त्यांची ‘कोल्हानचा टायगर’ अशी ओळख आहे. झारखंडमधील विधानसभेच्या ८१ जागांपैकी २८ जागा आदिवासी समुदायासाठी राखीव आहेत. या जागांवर भाजपाची ताकद कमी आहे. चंपाई सोरेन यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे भाजपाची या जागांवरील ताकद वाढणार आहे. त्यामुळे राज्यात झारखंड मुक्ती मोर्चा व काँग्रेससमोरील आव्हानं वाढली आहेत.
हे ही वाचा >> पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…
विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपाचा मास्टरस्ट्रोक?
आगामी काही महिन्यांमध्ये देशातील तीन राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. सर्वात आधी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. तर, झारखंड व महाराष्ट्रात वर्षाच्या अखेरीस निवडणूक होईल. लोकसभा निवडणुकीत या राज्यांमध्ये भाजपाला कमी यश मिळालं होतं, ते अपयश झाकण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करून दाखवण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल. भाजपाने या चारही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित केलं आहे.