झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते चंपाई सोरेन यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्रीपदावरून अपमानास्पद पद्धतीने दूर केल्याची खदखद व्यक्त केली होती. त्यानंतर ते पक्षातून बाहेर पडून स्वत:चा पक्ष काढतील किंवा दुसऱ्या पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. दरम्यान, या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. चंपई सोरेन हे भाजपात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झालं आहे.
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत चंपई सोरेन यांच्या पक्षप्रवेशाची माहिती दिली आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री तसेच आदिवासी समाजाचे नेते चंपई सोरेन यांनी नुकताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. चंपई सोरेन हे ३० ऑगस्ट रोजी अधिकृतरित्या भाजपात प्रवेश करतील. रांची येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल, असं हिमंता बिस्वा सरमा म्हणाले.
हेही वाचा – झारखंड मुक्ती मोर्चात फुटीची चिन्हे? चंपाई सोरेन भाजपच्या वाटेवर? इंडिया आघाडीचा प्रतिसाद काय?
चंपई सोरेन यांच्या या निर्णयानंतर आता झारखंडच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. चंपाई हे हेमंत सोरेन यांचे वडील शिबू यांचे निकटवर्तीय मानले जातात. बिहारमधून झारखंड वेगळे राज्य निर्माण करण्यात आले. या चळवळीत चंपई सोरेन सक्रिय होते. आता वयपरत्वे शिबू सक्रिय राजकारणात नाहीत. झारखंड मुक्ती मोर्चाची सूत्रे हेमंत यांच्या हाती आहेत. पक्षाचे नेतृत्व हुकूमशाही पद्धतीने वागत असल्याचा चंपई यांचा आक्षेप आहे. त्यामुळेच त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.
समाज माध्यमावर पोस्ट करत व्यक्त होती नाराजी
दरम्यान, चंपई सोरेन यांनी काही दिवसांपूर्वी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत नाराजी व्यक्त होती. आपल्याला अपमानास्पद पद्धतीने मुख्यमंत्री पदावरून काढल्याचा आरोप त्यांनी केला होता. “सत्ता मिळाल्यावर बाबा तिलका मांझी, भगवान बिरसा मुंडा आणि सिदो-कान्हू यांसारख्या वीरांना आदरांजली अर्पण करून मी राज्याची सेवा करण्याचा संकल्प केला होता. मी कधीही कोणावरही अन्याय केला नाही किंवा होऊसुद्धा दिला नाही. हूलच्या दुसऱ्या दिवशी माझे पुढील दोन दिवसांचे सर्व कार्यक्रम पक्षनेतृत्वाने पुढे ढकलले. यापैकी एक कार्यक्रम दुमका येथे, तर दुसरा पीजीटी शिक्षकांना नियुक्ती पत्र वाटपाचा होता. याबाबत विचारलं असता, ३ जुलै रोजी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे, तोपर्यंत तुम्ही मुख्यमंत्री म्हणून कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नसल्याचे सांगण्यात आलं”, असं चंपई सोरेन यांनी म्हटलं होतं.
“मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम दुसऱ्याने रद्द करून घेण्यापेक्षा लोकशाहीत अपमानास्पद काही असू शकते का?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसेच “या अपमानास्पद वागणुकीमुळे मी माझ्या अश्रूंवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. ज्या पक्षासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य समर्पित केले, त्या पक्षात माझे अस्तित्वच नाही, असे मला वाटत होतं. इतका अपमान सहन केल्यानंतर मला पर्यायी मार्ग शोधणे भाग पडले”, असेही ते म्हणाले होते.