Champions Trophy 2025 : भारतीय क्रिकेट संघाने आज (९ मार्च) ऐतिहासिक कामगिरी करत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे जेतेपद पटकावले आहे. भारताने न्यूझीलंडचा अंतिम सामन्यात ४ विकेट्सने पराभव केला. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने या संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता विजयाला गवसणी घातली आहे. या विजयासह टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद तिसऱ्यांदा पटकावणारा पहिला संघ ठरला आहे. दरम्यान या विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. सर्व स्तरांमधून टीम इंडियाचे अभिनंतन केले जात आहे. यातच राजकीय वर्तुळात देखील प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, शरद पवार, राहुल गांधी इत्यादी नेत्यांनी भारतीय संघाचे कौतुक करत पोस्ट केल्या आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाच्या विजयानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केला आहे. “एक असामान्य खेळ आणि एक असामान्य निकाल! आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी घरी घेऊन आल्याबद्दल आपल्या संघाचा अभिमान वाटतो. ते संपूर्ण स्पर्धेत आश्चर्यकारकर खेळ केला. सर्वांगीण कामगिरीबद्दल आपल्या संघाचे अभिनंदन,” अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारतीय संघाच्या विजयानंतर पोस्ट मध्ये हा जबरदस्त विजय असल्याचे म्हटले आहे. “तुमच्या पैकी प्रत्येकाने अब्जावधी लोकांची मने अभिमानाने भरली आहेत. या स्पर्धेत टीम इंडियाची अभूतपूर्व कामगिरी, याबरोबरच खेळाडूंची वैयक्तिक कामगिरी आणि मैदानावर त्यांचे वर्चस्व हे खरोखरच प्रेरणादायी आहे. अभिनंदन, चॅम्पियन्स!” असे राहुल गांधी म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील भारतीय क्रिकेट संघाच्या विजायाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संधाचे अभिनंदन केले आहे. “न्यूझीलंडविरुद्धच्या रोमांचक अंतिम सामन्यात भारत विजयी झाल्याने आपल्या सर्वांना प्रचंड आनंद झाला आहे, देशभरातील लाखो हृदये अभिमानाने भरली आहेत.”
“भारतीय क्रिकेट संघाने पुन्हा एकदा त्यांची कधीही पराभूत न होणारं मनोधैर्य, उत्साह आणि कौशल्याच्या दाखवलं आणि जगाला दाखवून दिलं की ते सर्वोत्तम का आहेत. इतक्या मोठ्या व्यासपीठावर त्यांच्या दमदार कामगिरीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो. भारतीय क्रिकेट इतिहासात आणखी एक अविस्मरणीय अध्याय जोडल्याबद्दल टीम इंडियाचे आभार,” असेही शरद पवार म्हणाले आहेत.
देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याला “इतिहास घडवणारा विजय” असे म्हटले आहे.
“आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये दिमाखदार विजय मिळवल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन. तुमची कधीही न संपणारी उर्जा आणि मैदानावरील तुम्ही दाखवलेले वर्चस्व याचा देशाला अभिमान वाटतो,” असे अमित शाह म्हणाले आहेत.