देशभरातील गल्ल्यांपासून ते दिल्लीपर्यंत सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरत असलेल्या मुंबई ड्रग्ज केस प्रकरणात, सर्वाधिक चर्चित चेहरा ठरलेल्या आर्यन खान प्रकरणावर आता बॉलिवूडचा बादशहा व आर्यनचा पिता शाहरुख खान पहिल्यांदाच मौन सोडणार असल्याचं समोर येत आहे. विशेष म्हणजे आपल्या संपूर्ण टीमसह दिल्लीला रवाना होताना शाहरुख खानला मुंबई विमानातळावर पाहीलं गेलं आहे.

आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणामुळे शाहरुख व त्याचे कुटुंब अनेक दिवस अतिशय त्रासात दिसून आले होते. आतापर्यंत शाहरुखने या प्रकरणावर मौन बाळगलेलं आहे. मात्र, माध्यमांवरील वृत्तांवरून असं दिसून येत आहे की, आता शाहरुख या प्रकरणावरील मौन लवकरच सोडू शकतो. माध्यमांवरील बातम्यानुसार, शाहरुखला अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी मुलाखतीसाठी संपर्क साधला आहे. शिवाय, अशातच शाहरुख आपल्या संपूर्ण टीमसह दिल्लीला रवाना होताना, मुंबई विमानतळावर दिसला होता. मुंबईतील कलिना टर्मिनलवरून शाहरुखने एक खासगी विमान यासाठी घेतल्याचंही दिसून आलं.

इंडिया टुडेच्या एका रिपोर्टनुसार, शाहरूख खानची मॅनेजर पूजा ददलानीशी इंग्लड आणि अमेरिकेतील अनेक वृत्तवाहिन्यांनी आर्यन ड्रग्ज केस प्रकरणी शाहरुख खानच्या मुलाखतीसाठी संपर्क साधला आहे. शिवाय, अशी देखील माहिती समोर येत आहे की शाहरुख लवकरच याप्रकरणावरील मौन सोडून, आपली भूमिका स्पष्ट करू शकतो. मात्र याची वेळ, तारीख व ठिकाण काय असेल? किंवा शाहरूख या प्रकरणावर खरच बोलणार का? याबाबत अद्याप काहीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आतापर्यंत या प्रकरणावर शाहरुखने कायम मौन बाळगलेलं आहे, माध्यमांना एक शब्दाचीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे शाहरुख खरच मौन सोडणार का? हा देखील प्रश्नच आहे.

Story img Loader