पीटीआय, नवी दिल्ली : चीनमध्ये करोना रुग्ण संख्येत झपाटय़ाने वाढ होत असली तरी भारतातील सध्याची स्थिती उत्तम असून ओमायक्रॉनचा उपप्रकार असलेल्या एक्सबीबी आणि बीएफ.७ च्या खूप कमी रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच या उपप्रकारामुळे भारतात रुग्ण संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता नाही, असा दावा प्रसिद्ध विषाणूतज्ज्ञ डॉ. गगनदीप कांग यांनी शुक्रवारी केला. अनेक देशात या उपप्रकाराच्या रुग्ण संख्येत झपाटय़ाने वाढ होत असताना कांग यांचे यांचा दावा दिलासा देणारा आहे.
डॉ. कांग यांनी सांगितले की, भारतातील बहुसंख्य नागरिकांचे लसीकरण झाले आहे. ओमाक्रॉनमुळेही बहुसंख्य नागरिकांना संसर्ग झाला आहे. त्यामुळे एक प्रकारे देशातील नागरिकांना ‘हायब्रिड इम्युनिटी’ मिळाली आहे. सध्या भारत चांगले काम करत आहे. परंतु विषाणूच्या वर्तनातील कोणत्याही बदलांचे संकेत शोधण्यासाठी त्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. बीएफ.७ हा ओमायक्रॉनचा उपप्रकार बीए.५ शी संबंधित आहे. याचा संसर्ग लसीकरण झालेल्या व्यक्तींनाही पुन्हा होऊ शकतो. सध्या भारत चांगले काम करत आहे. आपल्याकडे खूप अल्प रुग्ण आहेत. एक्सबीबी आणि बीएफ.७चे काही रुग्ण असले तरी ही संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली नाही. त्यामुळे रुग्ण संख्या मोठय़ा प्रमाणात वाढण्याची शक्यता वाटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चीनमधील स्थिती भारतातील दुसऱ्या लाटेसारखी
सध्या चीनमधील परिस्थिती ही भारतातील दुसऱ्या लाटेच्या काळातील म्हणजेच एप्रिल-मे २०२१ आणि जानेवारी २०२२ मधील स्थितीप्रमाणे आहे. चीनमध्ये वेगाने पसरलेला प्रकार हा ओमायक्रॉन आहे. लसीकरण केलेल्या लोकांमध्येही त्याचा प्रसार झाला असून तो खूप संसर्गजन्य आहे, असेही त्यांनी सांगितले. चीनमधील बहुसंख्य लोकांना करोना लसीकरणाची दुसरी मात्राही देण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. बहुसंख्य रुग्ण घरातच बरे होत आहेत. काही मोजक्याचा रुग्ण गंभीर होत आहेत. त्यापैकी अनेकांना अगोदरच गंभीर आजार आहेत, असे डॉ. कांग यांनी एका ट्वीटमध्ये नमूद केले.