जत्रेतील पाळणे असो वा मॉमलधील आगगाडी किंवा टायट्रेन, लहान मुलांना यातून सैर करायला प्रचंड आवडतं. पण या टॉय ट्रेनने एका अवघ्या ११ वर्षाच्या मुलाचा जीव घेतला आहे. शनिवारी २२ जून रोजी पंजाबच्या चंदीगड शहरात ही घटना घडली आहे.

ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तर, हे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, “चंडीगढच्या एलांते मॉलमधील एका दुःखद घटनेचे सीसीटीव्ही व्हिज्युअल, जिथे एक टॉय ट्रेन उलटली, ज्यामुळे नवांशहरमधील शाहबाज नावाच्या ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. व्हिडिओमध्ये दिसतंय की शाहबाज टॉय ट्रेनच्या खिडकीतून बाहेर झुकताना चालकाने वळण घेतल्याने ती अचानक उलटली. पोलिसांनी टॉय ट्रेन ताब्यात घेतली आहे आणि ऑपरेटरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टॉय ट्रेन जप्त, गुन्हा दाखल

पोलिसांनी टॉय ट्रेन ताब्यात घेतली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात झाला तेव्हा शाहबाज टॉय ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करत होता, असे स्थानिक माध्यमांनी सांगितले. ट्रेन उलटल्यानंतर काही वेळातच शाहबाजला चिरडले गेले, तेव्हा आजूबाजूच्या काही लोकांनी आतल्या मुलांना वाचवण्यासाठी ट्रेनकडे धाव घेतली. इतरांची सुखरूप सुटका करण्यात आली, तर शाहबाज गंभीर जखमी झाला. त्याला लगेचच GMCH ३२ रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जतिंदर पाल सिंग यांनी पोलिसात तक्रार नोंदवली. टॉय ट्रेन ऑपरेटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौरभ आणि मॉलच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर निष्काळजीपणा आणि गैरवर्तनाचा आरोप करण्यात आला आहे.