आई-वडिलांच्या नावाला काळिमा फासणारी भयंकर घटना समोर आली आहे. रेल्वेच्या कमोडमध्ये नवजात बाळ मिळाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. रविवारी हावडाहून अमृतसरला पोहचलेल्या ट्रेनमध्ये सफाई सुरू असताना कर्मचाऱ्यांना टॉयलेटमध्ये एक नवजात बाळ आढळलं. ज्याला ओढणीने लपटून कमोडमध्ये टाकले होते. या भयंकर घटनेमुळे पंजाबमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, हावडा मेलच्या एसी डी-३ डब्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. रविवारी सकाळी गाडी अमृतसरला पोहचल्यानंतर कर्मचारी ट्रेनची सफाई करत होते. त्यावेळी ही घटना समोर आली.
या प्रकारानंतर सफाई कर्मचाऱ्याने याबद्दल तात्काळ माहिती अधिकाऱ्यांना कळवले. जेव्हा बाळाला कमोडमधून बाहेर काढण्यात आलं तेव्हा बाळाचा श्वास सुरू होता. त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सगळ्यात धक्कादायक म्हणजे ओढणीमध्ये गुंडाळलेलं हे नवजात बाळ फ्लशमध्ये अडकलं होतं. सध्या या बाळावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर पोलीस आता या संपूर्ण प्रकाराचा कसून तपास करणार आहेत.