हरयाणामध्ये तरुणीचा पाठलाग करणाऱ्या विकास बरालाला अखेर चंदिगड पोलिसांनी अटक केली. बुधवारी दुपारी पोलिसांनी विकासला समन्स बजावले होते. यानंतर बुधवारी संध्याकाळी विकास पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याला अटक केली. विकास बराला हा हरयाणातील भाजप प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा आहे.
गेल्या आठवड्यात शुक्रवारी रात्री विकास बराला आणि त्याचा मित्र आशीष कुमार या दोघांनी एका तरुणीचा पाठलाग केला होता. पीडित तरुणीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन घटनेची माहिती दिली. पोलिसांनी दोघांना अटकही केली. मात्र जामीनावर दोघांना सोडण्यात आले होते. पोलिसांवर या दोघांवर कारवाईसाठी दबाव वाढत होता. पोलिसांनी विकासला समन्सही बजावले होते. बुधवारी दुपारी विकास पोलिसांसमोर हजर झाला. चौकशीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली. विकासचा मित्र आशीष कुमार याचीदेखील चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
माझ्या मुलाचे नाव एफआयआरमध्ये असेल तर कायद्यानुसार पुढील कारवाई झालीच पाहिजे. पोलिसांनी योग्य ती कारवाई केलीच पाहिजे असे सुभाष बराला यांनी सांगितले. तर पीडित मुलीच्या आयएएस वडीलांनी या प्रकरणावर बुधवारी प्रतिक्रिया दिली. आरोपीच्या कुटुंबीयांकडून पोलिसांवर दबाव आल्याचे तूर्तास निदर्शनास आलेले नाही असे त्यांनी सांगितले. सोमवारी चंदिगड पोलिसांनी याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज नसल्याचे सांगितल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय बळावला होता. भाजप नेत्याच्या मुलाला वाचवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केला असा आरोपही सुरु झाला.