चंदीगड येथील एका खासगी विद्यापीठातील ‘लीक व्हिडिओ’ प्रकरणी विद्यापीठातील एका विद्यार्थिनीसह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सनी मेहता आणि रंजक वर्मा असे अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. या दोघांवर एका विद्यार्थीनीला तिच्या मैत्रिणींचे आपत्तीजनक व्हिडीओ बनवण्यासाठी ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे.
हेही वाचा – …म्हणून फडणवीस शिंदे सरकारच्या कारभारावर नाराज, राष्ट्रवादीचा दावा; भाजपाला दिला सावध राहण्याचा इशारा
काय आहे प्रकरण?
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल होताच विद्यार्थ्यांनी शनिवारी रात्री विद्यापीठ परिसरात धरणा आंदोलन सुरू केले होते. जवळपास ६० विद्यार्थींनींचा आपत्तीजनक व्हिडीओ व्हायरल झाला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. तर विद्यापीठ प्रशासनाने जारी केलेल्या निवेदनात एकच व्हिडीओ व्हायरल झाल्याचे म्हटले होते. तसेच एका विद्यार्थिंनीनेच हे व्हिडीओ बनवत आपल्या हिमाचलमधील मित्राला पाठवले असल्याचेही या निवेदनात म्हटले होते. विद्यापीठ परिसरात कोणत्याही विद्यार्थीनीने आत्महत्या केली नसून ही केवळ अफवा आहे. या पार्श्वभूमीवर येत्या २४ सप्टेंबरपर्यंत विद्यापीठात कोणताही वर्ग भरणार नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी भादंविच्या कलम ३५४-क आणि आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
आरोपींना पोलीस कोठडी
पोलिसांनी या प्रकरणातील सर्व आरोपींचे मोबाईल जप्त केले असून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी याप्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, पोलिसांनी सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.