तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी मंगळवारी सत्ताधारी वायएसआर काँग्रेस पक्षाच्या सदस्यांद्वारे त्यांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ ते उर्वरित कालावधीसाठी विधानसभेत प्रवेश करणार नाहीत असे जाहीर केले आहे. यानंतर मी या बैठकीला उपस्थित राहणार नाही. मी पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावरच सभागृहात परतेन असे चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहेय विधानसभेतून बाहेर पडण्यापूर्वी नायडू खूपच भावूक दिसत होते त्याच्या डोळ्यात अश्रू आले होते.
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महिला सबलीकरणावरील चर्चेदरम्यान विधानसभेत चंद्राबाबू नायडू यांनी त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध केलेल्या कथित अपमानास्पद टिप्पणीबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर, मंगलागिरी येथील टीडीपीच्या राज्य मुख्यालयात पत्रकार परिषदेत संबोधित करताना, ७१ वर्षीय नायडू यांना अश्रू अनावर झाले. काही मिनिटे ते बोलू शकले नाहीत, कारण त्यांचा आवाज भरलेला होता. हाताने चेहरा झाकून ते काही मिनिटे रडत होते.
माझी पत्नी कधीही राजकारणात नव्हती असेही नायडू म्हणाले.. “मी सत्तेत असो की बाहेर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला प्रोत्साहन देण्याव्यतिरिक्त, पत्नीने कधीही राजकारणात हस्तक्षेप केला नाही. तरीही त्यांनी माझ्या पत्नीला अपमानित करण्याचा प्रयत्न केला,” असे नायडू रडत रडत म्हणाले.
आपल्या ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत इतके दुख कधीच जाणवले नाही, असे ते म्हणाले. “मी माझ्या आयुष्यात अनेक संघर्ष, चढउतारांचा सामना केला. मी विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षात अनेक जोरदार वादविवाद पाहिले. पण विरोधकांना अशा प्रकारे चिरडणे हे अभूतपूर्व आहे, असे टीडीपी प्रमुख नायडू म्हणाले.
नायडू यांनी याची तुलना महाभारतातील कौरव सभेशी केली, जिथे बलाढ्य कौरवांनी पांडवांची पत्नी द्रौपदी हिचा अपमान केला आणि तिला सर्वांसमोर उभे करण्याचा प्रयत्न केला. “अधिक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सत्ताधारी पक्षाचे सदस्य माझ्या पत्नीला ओढून शिवीगाळ करत असताना सभापती मूक प्रेक्षक बनून राहिले. माझ्या उर्वरित कार्यकाळ विधानसभेपासून दूर राहण्याच्या निर्णयावर मला बोलण्याची किंवा विधान करण्याची संधीही दिली नाही. मला माझ्या हक्कासाठी लढावे लागले, असे नायडू म्हणाले.
हा सर्व प्रकाराची सुरुवात टीडीपी आणि वायएसआर काँग्रेस सदस्यांमध्ये महिला सक्षमीकरणाच्या चर्चेवरून शब्दयुद्धाने झाली. विरोधी पक्षावर हल्लाबोल करणाऱ्या वायएसआरसीपी सदस्य अंबाती रामबाबू यांच्या भाषणात टीडीपी आमदारांनी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला.
जेव्हा रामबाबूंनी नायडू यांच्या पत्नीचा उल्लेख करत काही असभ्य टिप्पणी केली तेव्हा टीडीपी सदस्यांनी निषेधार्थ मंचावर हल्ला केला आणि त्यांच्याकडून माफी मागण्याची मागणी केली. मंत्री बालिनेनी श्रीनिवास रेड्डी आणि कोडाली नानी यांच्यासह वायएसआरसीपीचे इतर सदस्यही टीडीपी सदस्यांशी भांडण करत व्यासपीठावर पोहोचले. यामुळे नायडू यांनी वायएसआरसीपी सदस्यांच्या कथित बेजबाबदार वर्तनाचा जोरदार विरोध केला आणि जाहीर केले की या कालावधीत ते विधानसभेत परतणार नाहीत.