कागदपत्रांचा वापर न करता आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाची बैठक सोमवारी पार पडली. त्यामुळे ई-गव्हर्नन्सच्या क्षेत्रात राज्याने आणखी एक पाऊल पुढे टाकल्याचे मानले जात आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीला ई-कॅबिनेट असे संबोधण्यात आले असून हा देशातील पहिलाच प्रयोग आहे.
राज्य मंत्रिमंडळाची नियमित बैठक सोमवारी पार पडली आणि त्या बैठकीत कागदपत्रांचा अजिबात वापर करण्यात आला नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीतील विषय आणि घेण्यात आलेले निर्णय इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा वापर करून नोंद करण्यात आले. महत्त्वाच्या विषयांवरही इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे सादरीकरण करण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले.
राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आणि अधिकारी यांच्यासाठी ‘क्लाऊड’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. सोमवारी प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली वापरण्यात आली. मात्र यापुढे मंत्रिमंडळाच्या बैठकीत याच पद्धतीचा वापर केला जाण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrababu naidu holds first paperless cabinet meet