निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असतानाही ती संस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या सूचनांनुसार काम करीत आहे, आयोग आम्हाला सहकार्य करीत नाही, असा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी येथे केला.

आंध्र प्रदेशातील मतदानाच्या वेळी इलेक्ट्रॉनिक यंत्रे (ईव्हीएम) योग्य प्रकारे काम करीत नव्हती त्याचा निवडणूक आयोगाकडे नायडू यांनी निषेध नोंदविला. नायडू यांनी तेलुगु देशमचे आमदार आणि नेत्यांसह आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि आंध्र प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पडली त्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य टिकविण्यासाठी, लोकशाहीसाठी निवडणूक आयोगाने पूर्वीप्रमाणे मतपत्रिकांद्वारे मतदान घ्यावे आणि ईव्हीएमचा वापर थांबवावा, अशी मागणी नायडू यांनी केली. राज्यातील ३०-४० टक्के ईव्हीएम योग्य प्रकारे काम करीत नव्हती अथवा निकामीच झाली होती, असे नायडू म्हणाले.

आंध्र प्रदेशमध्ये ७४ टक्के मतदान झाले, योग्य प्रकारे काम न करणारी ईव्हीएम आणि तेलुगु देशम, वायएसआर काँग्रेस आणि निवडणूक कर्मचारी यांच्यात उडालेल्या चकमकींचे गालबोटही लागले. अनंतपूर जिल्ह्य़ात झालेल्या चकमकीत तेलुगु देशम आणि वायएसआर पक्षाचा प्रत्येकी एक कार्यकर्ता ठार झाला.