तेलुगू देसमची राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी जवळीक वाढत असल्याच्या चर्चेने जोर धरलेला असतानाच त्या पक्षाचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी एका व्यासपीठावर आले होते. दिल्लीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यक्रमात नायडूंनी वाजपेयी सरकारच्या कार्यकाळाची स्तुती केली.
अर्थव्यवस्थेची गती मंद होण्यास काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार जबाबदार असल्याचा आरोप नायडूंनी केला. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसला पराभूत केले नाही तर आणि आपल्याला आणखी काही काळ हालअपेष्टांना तोंड द्यावे लागेल, असे भाकीत त्यांनी वर्तवले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या काळात तंत्रज्ञान, महामार्ग विकास या क्षेत्रात देशाने मोठी प्रगती केल्याचे गौरवोद्गार नायडूंनी काढले. न्यायालयाच्या निर्णयानंतर दोषी खासदारांना वाचवण्याच्या वटहुकूमावरून जो गोंधळ घातला गेला ते पाहता पंतप्रधान हे सोनिया गांधी यांच्या हातातील बाहुले असल्याचे उघड झाल्याची असल्याची टीका नायडूंनी केली. नरेंद्र मोदी यांनी छोटेखानी भाषणात नायडूंचा विशेष उल्लेख केला नाही. चंद्राबाबू नायडू २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होतील, अशी अटकळ बांधली जात आहे . तेलंगणाच्या मुद्दय़ावर त्यांनी भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांची भेटही घेतली आहे. भाजपने मात्र तेलगू देसमच्या रा. लो. आघाडीतील समावेशाबाबत चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.