राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील (एनईपी) त्रैभाषिक सूत्रावरून केंद्र सरकार आणि तमिळनाडूच्या ‘द्रमुक’ सरकारमध्ये द्वंद सुरू आहे. या संघर्षादरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी हिंदी शिकण्याचे समर्थन करत भाषा ही द्वेषासाठी नसल्याचे स्पष्ट केले. नागरिकांनी शक्य तितक्या भाषा शिकाव्यात आणि भाषांवरील अनावश्यक राजकारणापासून दूर राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांनीही दोन दिवसांपूर्वी भाषिक वादावर बोलताना, देशात दोनच नाही, तर बऱ्याच भाषांची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. पवन कल्याण यांच्या या भाषिक समर्थनानंतर चंद्राबाबू नायडू यांनी विधानसभेत बोलताना, ‘मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो की, भाषा द्वेष करण्यासाठी नाही. येथील (आंध्र प्रदेशात) मातृभाषा तेलुगू आहे. हिंदी ही राष्ट्रीय भाषा तर इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे.’ ‘भारताला राष्ट्रीय भाषा नाही. परंतु हिंदी आणि इंग्रजी या अधिकृत भाषा आहेत. तर इतर २२ भारतीय भाषा अनुसूचित भाषा म्हणून ओळखल्या जातात.’

हिंदी शिकण्याचे समर्थन करताना नायडू म्हणाले की, मातृभाषेचा विसर पडू न देता, उपजीविकेसाठी शक्य तितक्या भाषा शिकणे महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय भाषा शिकल्याने दिल्लीत हिंदीमध्ये अस्खलित संभाषण शक्य होईल, असेही त्यांनी नमूद केले. जे लोक त्यांच्या मातृभाषेत शिक्षण घेतात तेच जगभरात उत्कृष्ट कामगिरी करत असल्याचे त्यांनी सांगितले.