तेलुगू देसमचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांना उपोषणाच्या पाचव्या दिवशी नाटय़मयरीत्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलिसांनी आंध्र भवनमधून नायडूंना रुग्णालयात नेले. तेथे त्यांनी आपले उपोषण सुरूच ठेवले आहे. सलाइन लावण्यास नायडूंनी नकार दिल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आंध्र प्रदेशच्या विभाजनाच्या विरोधात नायडूंनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
डॉक्टरांच्या पथक नायडूंच्या प्रकृतीवर देखरेख ठेवून आहे. थोडा थकवा वगळता त्यांची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नायडूंना आंध्र भवनमधून हलवण्यासाठी मोठा फौजफाटा दाखल झाला. त्या वेळी तेलुगू देसमच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला. महिला कार्यकर्त्यां यामध्ये आघाडीवर होत्या. घटनास्थळी तेलुगू देसमच्या कार्यकर्त्यांनी नासधूस केली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. नायडूंना घेऊन जाणारी रुग्णवाहिका रोखण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. सुमारे एक तास हा गोंधळ सुरू होता. अखेर काही नातेवाईक आणि पक्षाच्या खासदारांसोबत नायडूंना राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारपासून चंद्राबाबू नायडू आंध्र भवनमध्ये उपोषणाला बसले आहेत, मात्र त्यांनी अवैधपणे या जागेत प्रवेश करून उपोषण सुरू केल्याचा आरोप आंध्र सरकारने केला होता. पोलिसांना ही जागा खाली करण्याची विनंती सरकारने केली आहे.