गोसीखुर्द धरणातील पाणी वैनगंगा नदीत मोठ्या प्रमाणात सोडण्यात आल्याने ब्रम्हपुरी तालुक्यातील २५ गावांना पुराचा फटका बसला आहे. तर लाडज या गावाला चारही बाजूने पुराच्या पाण्याने वेढले आहे. दरम्यान, चार बचाव पथकाने या गावातील २०० लोकांना सुखरूप बाहेर काढले आहे. तर शेकडो लोक अजूनही अडकून पडले आहेत. बचावकार्यासाठी आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हेलिकॉप्टर मागवलं मात्र सर्वदूर पाणी असल्याने व उतरण्यास जागा नसल्याने ते परत निघून गेलं. दरम्यान, सोमवारी सकाळी पुन्हा हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बचाव कार्य राबविण्यात येणार आहे.
भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगा नदीला पूर आला आहे. त्याचा परिणाम ब्रह्मपुरी तालुक्यात नदीबाहेर ८ ते १० किमीपर्यंत पाणी पसरले. त्यामुळे २५ गावं पुराच्या पाण्यानं वेढली गेली. पुराचे पाणी सर्वदूर पसरत असल्याचे बघून ब्रह्मपुरीचे ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांसह रात्रभर फिरून गावोगावी जाऊन लोकांना बाहेर काढले.
दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेश सुरवाडे यांनी शनिवारी रात्री पोलीस दलाचे एक बचाव पथक व आज सकाळी जिल्हा प्रशासनाने तीन बचाव पथकं घटनास्थळी पोहचले. लाडज या गावाला पुराच्या पाण्याने चारही बाजूंनी वेढले आहे. या गावात सर्वप्रथम मोहिम राबवून जवळपास २०० लोकांना सुखरूप बाहेर काढले. तसेच इतर लोकांना बाहेर काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तात्काळ एनडीआरएफच्या हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. दुपारच्या सुमारास लाडज येथे हेलिकॅप्टर आले. गावाच्या चारही बाजूने पाणी असल्याने हेलिकॉप्टर उतरण्यास जागा नव्हती. शेवटी बराच वेळ घिरट्या मारून ते परत गेले.
निवासी उपजिल्हाधिकारी गव्हाड यांच्या माहितीनुसार, “आता हे हेलिकॉप्टर सोमवारी सकाळी बचाव कार्यासाठी पुन्हा येणार आहे. लाडज येथे अजूनही शेकडो लोक अडकून पडले आहेत. बचाव पथकाव्दारे बेटाला, रानमोचन गाव व परिसरातील राईस मिल, पोल्ट्री फॉर्म येथे अडकलेले ४० ते ५० मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. तर २ बोटींमार्फत लोकांना पिंपळगाव येथे पाठवण्यात आले आहे. तसेच बेळगाव, अहेर नवरगांव, चिखलगाव, पिंपळगाव व इतर छोट्या गावातून बोटीने १३५० लोकांना सुरक्षितस्थळी पोहचविण्यात आले.
बचाव कार्यासाठी एनडीआरफचे दोन पथकं रात्री उशिरा ब्रम्हपुरीत दाखल होत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी गव्हाड यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली. सावली तालुक्यातील निमगाव, बेलगांव यालाही पुराचा फटका बसला आहे. तर पुरामुळे चंद्रपूर-आलापल्ली, ब्रम्हपुरी-आरमोरी, वडसा-लाखांदूर मार्ग बंद झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातही छोट्या मोठ्या नाल्यांना पूर आला आहे.