भीम आर्मी या संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर उत्तर प्रदेशातल्या सहारनपूर येथे जीवघेणा हल्ला झाला. ते कारने देवबंदला जात असताना काही अज्ञातांनी त्यांच्या कारवर गोळीबार केला. यात चंद्रशेखर आझाद जखमी झाले. यानंतर जखमी अवस्थेतच चंद्रशेखर आझाद यांनी या हल्ल्यावर त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी हल्ला कसा झाला याची माहिती दिली.
चंद्रशेखर आझाद म्हणाले, “मला आठवत नाही. मात्र, माझ्याबरोबर असणाऱ्या लोकांनी हल्लेखोरांना ओळखलं आहे. हल्लेखोरांची गाडी सहारनपूरच्या दिशेने गेली. आमच्या गाडीत एकूण पाच लोक होते. गोळीबार झाल्यावर आम्ही यू टर्न घेतला. त्यानंतर काय घडलं मला माहिती नाही.”
व्हिडीओ पाहा :
“आमचे सहकारी डॉ. महिपाल यांनाही कदाचित गोळी लागली”
“आमच्याबरोबर असणारे आमचे सहकारी डॉ. महिपाल यांनाही कदाचित गोळी लागली आहे. मला नक्की काय घडलं आठवत नाही, मात्र त्यांच्या हातातून रक्त येत होतं. त्यांना कदाचित गोळी लागली आहे. जेव्हा गोळीबार झाला तेव्हा मी घाबरलो होतो. त्यामुळे मला नक्की काय घडलं ते आठवत नाही,” असं चंद्रशेखर आझाद यांनी सांगितलं.
“गोळीबार झाल्यावर मी सहारनपूरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन केला”
गोळीबार झाल्यावर मी सहारनपूरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन केला. तसेच माझ्यावर गोळीबार झाल्याची त्यांना माहिती दिली. मला वेदना होत आहेत. त्यामुळे मला गोळी लागली असावी, असंही त्यांना सांगितल्याची माहिती आझाद यांनी दिली.
“माझं कुणाशीही काही भांडण नाही”
कुणावर काही संशय आहे का असं विचारल्यानंतर चंद्रशेखर आझाद म्हणाले की, माझं कुणाशीही काही भांडण नाही. त्यामुळे कुणावर संशय नाही.