विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ८ एप्रिलला गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचं वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलं आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अशातच आज ( १७ एप्रिल ) अजित पवारांनी आपले पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. तर, दुसरीकडे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार आशिष शेलार दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “केवळ प्रशासकीय कामासाठी दिल्लीला आलो आहे. नागपुरातील एनटीपीसी प्रकल्पाच्या संदर्भातील प्रश्नासाठी देशाचे उर्जामंत्री आर. के. सिंग यांच्याकडे बैठक आहे. तर, आशिष शेलार हे मुंबईवरून दिल्ली आणि नंतर बँगलोरला जातील. त्यामुळे कोणत्याही राजकीय कामासाठी आलो नाही.”
हेही वाचा : “महाराष्ट्रात भाजपाला एकहाती सत्ता मिळण्याची शक्यता नाही”, गजानन कीर्तिकर यांचं वक्तव्य; म्हणाले, “२०२४ ला…”
अजित पवारांनी पुण्याचे दौरे रद्द केलेत? असं विचारलं असता बावनकुळेंनी म्हटलं, “याबद्दल मला काहीच माहिती नाही. अजित पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही. त्यामुळे मला याबद्दल कोणतीही माहिती नाही.”
अजित पवारांना बरोबर घेऊन सरकार स्थापन करणार का? असा प्रश्न विचारल्यावर बावनकुळेंनी सांगितलं, “अशा चर्चा खूप होत असतात. जर तर ला जीवनात अर्थ नसतो.”
अजित पवार भाजपात आपल्यावर स्वागत करणार का? असे विचारल्यावर बावनकुळे म्हणाले, “देव, देश आणि धर्म ही आमची काम करण्याची पद्धत आहे. कालपर्यंत कोणत्या विचारधारेत होता, माहिती नाही. पण, आमच्या पक्षात आल्यावर विचारधारेच्या आधारावरच काम करावं लागतं. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा संकल्प आम्हाला पूर्ण करावा लागतो. त्यामुळे आमच्या विचारधारेशी सहमत असाल, तर आमचा विरोध नाही.”
हेही वाचा : अजित पवार खरंच नाराज आहेत? संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “काल रात्री ते…!”
“भाजपात प्रत्येक बुथवर २५ कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश आम्ही घेतोय. ३० एप्रिलच्या ‘मन की बात’ कार्यक्रमापर्यंत २५ लक्ष पक्षप्रवेश भाजपात होणार आहेत. हा महिना संपूर्ण पक्षप्रवेशाचा असणार आहे. १ लक्ष बुथवर आमचे कार्यकर्ते काम करतात. राज्यातील ७०० पदाधिकारी प्रत्येक बुथवर जात आहेत,” अशी माहितीही चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे.