भारताची चांद्रयान ३ ही महत्त्वकांक्षी मोहीम काल (२३ ऑगस्ट) यशस्वी झाली असून इस्रोने पाठवलेलं अवकाशयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरलं आहे. विक्रम लँडरने संध्याकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी चांद्रयानाचं चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अवकाशयान उतरवणारा भारत या जगातला पहिलाच देश ठरला आहे. त्यामुळे जगभरातून भारत आणि भारताची अंतराळ संसोशन संस्था इस्रोचं कौतुक होत आहे. जगभरातील अंतराळ वैज्ञानिक भारतावर स्तुतीसुमनं उधळत आहेत. दरम्यान, कॅनडाचे पहिले अंतराळवीर ख्रिस हेडफिल्ड यांनीही भारताचं कौतुक केलं आहे. तसेच ते म्हणाले, भारताच्या या मोहिमेकडून त्यांना खूप अपेक्षा आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ख्रिस हेडफिल्ड म्हणाले, भारताच्या या चांद्रमोहिमेद्वारे चंद्रावर पाण्याच्या अस्तित्वाबाबत महत्त्वाची माहिती मिळू शकते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणं ही खूप अवघड गोष्ट होती, जी भारताने केली आहे. परंतु, खरं कामं आता सुरू होणार आहे.

चांद्रयानाचं सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर प्रचंड धूळ उडाली, ही धूळ खाली बसून वातावरण मोकळं होण्यास दोन तासांहून अधिक वेळ लागला. त्यानंतर काही वेळाने भारताने पाठवलेला प्रज्ञान रोव्हर बाहेर आला. सॉफ्ट लँडिंगनंतर २.२६ तासांनी रोव्हर बाहेर आला. आता पुढचे १४ दिवस विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्रावर संशोधन करून माहिती गोळा करून पृथ्वीवर पाठवतील. हे १४ दिवस तिथे सूर्यप्रकाश असणार आहे. १४ दिवसांनी तिथे अंधार होईल. अंधार झाल्यानंतर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर या दोघांचंही काम थांबेल. चंद्रावर सूर्य उगवल्यानंतर पुन्हा दोघांचं काम सुरू होऊ शकतं.

दरम्यान, चांद्रयानाच्या सॉफ्ट लँडिंगबद्दल कॅनेडियन अंतराळवीर हेडफील्ड म्हणाले, या केवळ प्रारंभिक गोष्टी होत्या. चंद्रावर आपण जे काही शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, किंवा आगामी काळात करणार आहोत, त्यासाठीचा एक सुरक्षित दरवाजा उघडला आहे. खरं काम तर आता सुरू होणार आहे. हेडफील्ड हे एनडीटीव्हीशी बोलत होते.

हे ही वाचा >> “…म्हणून आम्ही दक्षिण ध्रुव निवडला”, इस्रो प्रमुखांनी सांगितलं Chandrayaan 3 मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट

अंतराळ संशोधक ख्रिस हेडफिल्ड म्हणाले, भारताचं चांद्रयान-३ आणि विक्रम लँडर दक्षिण ध्रुवावर उतरले आहेत. जर पृथ्वीशी तुलना करायची झाल्यास हा भाग म्हणजे पृथ्वीवरील अंटार्क्टिकासारखा असावा. या भागात सावली असते, त्यामुळे येथे पाणी सापडण्याच्या शक्यता आहेत. आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कधीच गेलो नव्हतो. इथे नव्या संशोधनाला वाव आहे. अशा प्रकारची प्रत्येक मोहीम आपल्या ज्ञानात भर घालते. भारत, भारतीय लोक आणि इस्रो पुढे काय करते ते पाहणं मनोरंजक असेल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrayaan 3 canada astronaut chris hadfield says now real work starts pragyan rover rollout on moon asc
Show comments