भारताने आज नवीन इतिहास रचला आहे. कारण भारताची चांद्रयान ३ ही मोहीम यशस्वी झाली आहे. विक्रम लँडरने चांद्रयानाचं चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं आहे. भारताची चांद्रयान २ ही मोहीम अपयशी ठरली होती. या अपयशातून आम्ही खूप काही शिकलो आहोत, असं इस्रोच्या शास्त्रज्ञांनी म्हटलं होतं. चांद्रयान २ चं अपयश मागे टाकून इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान ३ ही मोहीम यशस्वी केली आहे. जगाला हेवा वाटेल असं यश भारताने संपादित केलं आहे. बिग बजेट बॉलिवूड चित्रपटाच्या खर्चात इस्रोने ही मोहीम फत्ते केली आहे.
आपण सगळेजण आज इस्रोचं आणि चांद्रयान मोहिमेचं यश पाहत असलो तरी गेल्या अनेक महिन्यांपासून इस्रोचे वैज्ञानिक या मोहिमेवर काम करत होते. मोहीम सुरू झाल्यानंतर ४१ दिवसांनी भारताचं चांद्रयान आज चंद्रावर उतरलं आहे. परंतु, या मोहिमेवर किती खर्च झाला? हे यानाचं उड्डाण कुठून झालं होतं? आता लँडिंगनंतर पुढे काय? असे अनेक प्रश्न आपल्या मनात आहेत. या प्रश्नांनी उत्तरं तुम्हाला या बातमीद्वारे मिळेल.
मोहिमेची घोषणा कधी झाली? चांद्रयान कधी लाँच केलं?
इस्रोने ६ जुलै रोजी चांद्रयान-३ मोहीम लाँच करणार असल्याची माहिती दिली. १४ जुलै रोजी श्रीहरीकोटा येथून चांद्रयान अंतराळात पाठवलं जाईल असं इस्रोने जाहीर केलं. त्याच्या दुसऱ्या दिवशी इस्रोच्या वैज्ञानिकांनी श्रीहरीकोटा येथील लाँच पॅडचं निरीक्षण केलं. त्यानंतर १४ जुलै रोजी चांद्रयान-३ मोहिमेचे श्रीहरीकोटा येथून दुपारी २.३५ वाजता जीएसएलव्ही मार्क ३ (एलव्हीएम ३) हेवी-लिफ्ट लाँच व्हीकलद्वारे प्रक्षेपण करण्यात आलं.
लँडिंगनंतर पुढे काय?
विक्रम लँडर चंद्राच्या पृष्टभागावर यशस्वीपणे उतरला आहे. आता HAZARD डिटेक्शन कॅमेरे सुरू केले जातील. लँडिंगनंतरचे धोके तपासण्यासाठी हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांद्वारे निरिक्षणानंतर जेव्हा सर्वकाही ठीक असल्याचा सिग्नल मिळेल तेव्हा रोव्हर बाहेर येईल. लँडरवरून उतरताना रोव्हरची गती एक सेंटीमीटर प्रतिसेकंद इतकी असेल. रोव्हरची दोन चाकं चंद्राच्या पृष्टभागावर एक पॅटर्न बनवतील (ठसा उमटवतील). इस्रोचा लोगो आणि भारताच्या राष्ट्रीच चिन्हाचा ठसा उमटवला जाईल. त्यानंतर हा रोव्हर चंद्रावर फिरेल आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचं परिक्षण करेल.
मोहीम किती दिवस चालली?
चांद्रयान ३ हे १ ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेजवळ पोहोचलं. या दिवसापासून चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करून लँडिंगच्या तयारीला सुरुवात झाली. पाठोपाठ ५ ऑगस्ट रोजी चांद्रयान ३ ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. ६ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट या १० दिवसात चांद्रयानाने चंद्राची प्रदक्षिणा सुरू केली. तसेच चंद्राच्या पृष्ठभागाकडे प्रवास केला. १७ ऑगस्टला लँडर यानापासून वेगळा झाला आणि लँडिंगच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. आज (२३ ऑगस्ट) चांद्रयान ३ यशस्वीपणे चंद्रावर उतरलं. भारताचं हे यान ४१ दिवसांच्या प्रवासानंतर चंद्रावर यशस्वीरित्या लँड झालं आहे.
चांद्रयान ३ मोहिमेवरील खर्च किती?
इस्रोने या मोहिमेसाठी ६१५ कोटी रुपयांचं बजेट ठेवलं आहे. एखाद्या आंतराळ मोहिमेवरील हा सर्वात कमी खर्च आहे. रशियाच्या लुना २५ या मून मिशनचं बजेट १५०० कोटी रुपयांहून अधिक होतं.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग का केलं?
भारताचं हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्यात आलं आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर स्वतःचा झेंडा फडकवणारा भारत हा पहिलाच देश आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आंतराळ यान उतरवणं हे सर्वात अवघड आहे. येथे तापमान उणे २३० उंश सेल्सिअस इतकं आहे. दक्षिण ध्रुवावर पाणी आणि प्रमुख खनिजे असल्याचा दावा केला जातो. केवळ याच कारणासाठी इस्रोने आपलं यान दक्षिण ध्रुवावर उतरवलं आहे.
दक्षिण ध्रुवाच्या नजीक आतापर्यंत एकही अंतराळयान का उतरलं नाही?
चंद्राच्या विषुववृत्तीय भागावरच आतापर्यंत अनेक अंतराळयाने उतरण्यामागे काही कारणे आहेत. चीनचे चँग-ई ४ (Chang’e 4) हे अंतराळयान विषुववृत्ताच्या पुढे जाऊन उतरणारे पहिले अंतराळयान ठरले होते. चँग-ई ही चीनची चंद्रमोहीम असून त्यांच्या चांद्रसंशोधन कार्यक्रमातील दुसरा टप्पा होता. ही बाजू पृथ्वीवरून दिसत नाही. तर विषुववृत्ताजवळ उतरणं सोपं आणि सुरक्षित असल्याचं मानलं जातं. येथील भूप्रदेश आणि तापमान हे सहन करण्याजोगे आणि उपकरणांसह शोधमोहीम करण्यास दीर्घकाळासाठी अनुकूल असणारे आहे. येथील पृष्ठभाग अतिशय सपाट असून उंच टेकड्या किंवा पर्वत जवळपास नाहीत. तसेच मोठ्या खळग्यांचेही प्रमाण येथे खूप कमी आहे. याठिकाणी सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात मिळतो, कमीतकमी पृथ्वीच्या बाजूने असणाऱ्या भागावर सूर्यप्रकाश असतो. त्यामुळे सौरऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांना नियमितपणे ऊर्जेचा पुरवठा होतो.
याउलट चंद्राचा ध्रुवीय प्रदेश अधिक कठीण आहे. येथील भूपृष्ठभाग सपाट नाही. येथील बरेच भाग पूर्णपणे अंधारात असून तिथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही. उत्तर ध्रुवाच्या तुलनेत दक्षिण ध्रुव आणखी गडद अंधारात आहे. याठिकाणचे उणे २३० अंश सेल्सियस पेक्षाही कमी तापमान असते. सूर्यप्रकाशाचा अभाव आणि अत्यंत कमी तापमानामुळे उपकरणांकडून काम करणे अवघड होते. याशिवाय दक्षिण ध्रुवावर काही सेंटिमीटर्सपासून ते काही हजार किलोमीटर्सपर्यंत विविध आकारांची विवरे आहेत.
हे ही वाचा >> Chandrayaan 3 Landing Live : “१४० कोटी भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण”, चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर मोदींचे उद्गार
आता पुढचं लक्ष्य काय?
दक्षिण ध्रुवावर विवरांमध्ये बर्फाच्या स्वरूपात पाणी असण्याची शक्यता वर्तवली जाते. शिवाय, अत्यंत थंड तापमान असल्यामुळे याठिकाणी अडकलेली एखादी वस्तू काहीही बदल न होता, अनेक वर्षांनंतरही गोठलेल्या अवस्थेत मिळू शकते. विवरांत जीवाश्म आढळल्यास त्यांच्या अभ्यासातून सूर्यमालेच्या निर्मितीच्या काळातील घडामोडींवर प्रकाश टाकता येऊ शकतो, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. २००८ साली भारताने राबवलेल्या चांद्रयान-१ मोहिमेतून चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याचे पुरावे मिळाले होते.