भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने अलीकडेच चंद्र मोहीमेचा भाग म्हणून चांद्रयान-३ चं यशस्वी प्रक्षेपण केलं. चांद्रयान-३ ने आता पृथ्वीपासून तीन लाख किलोमीटरचं अंतर व्यापलं असून चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेसाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा होता. यानंतर आता काही दिवसात चांद्रयान-३ चंद्रावर उतरवण्याचं लक्ष्य आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (इस्रो) याबाबतची पुष्टी केली आहे. आज सायंकाळी सातच्या सुमारास चांद्रयान-३ ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. पृथ्वीपासून तीन लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर यानाला चंद्राच्या स्थिर कक्षेत आणलं आहे.
१४ जुलै २०२३ रोजी सतीश धवन स्पेस सेंटरमधून LVM-3 रॉकेटच्या साह्याने चांद्रयान-3चं प्रक्षेपण झालं होतं. आता या यानाने पृथ्वी आणि चंद्रामधील अंतराळातील तीन लाख किलोमीटर अंतर व्यापलं आहे. या यानाने १ ऑगस्ट रोजी पृथ्वीभोवती आपली प्रदक्षिणा पूर्ण केली होती आणि चंद्राच्या दिशेने आपला ट्रान्स-लूनर प्रवास सुरू केला होता.
आज चांद्रयान-३ ने चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश केला आहे. हे यान चंद्रावर उतरवण्यापासून भारत आता केवळ एक पाऊल दूर आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास भारत हा चंद्राच्या पृष्ठभागावर अवकाशयान उतरवणारा अमेरिका, चीन आणि रशियानंतरचा जगातील चौथा देश बनणार आहे. हा ऐतिहासिक विक्रम बनवण्यापासून भारत अवघं एक पाऊल दूर आहे.
हेही वाचा- अवकाशाशी जडले नाते : चांद्रमोहिमांचे नवे पर्व
विशेष म्हणजे २०१९ मध्येही इस्त्रोनं चांद्रयान-२चं प्रक्षेपण केलं होतं. पण हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंग करण्यात अयशस्वी झालं. यानंतर आता इस्त्रोनं पुन्हा चांद्रयान-३ चं प्रक्षेपण केलं आहे.