अनेक अडथळे पार करून भारताचं चांद्रयान ३ आज यशस्वीरित्या चंद्रावर उतरलं. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या या मोहिमेकडे होतं. भारताचं हे यान आज (२३ ऑगस्ट) सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर उतरलं. विक्रम लँडरने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलं. भारताने चांद्रयान अंतराळात पाठवण्याआधी रशियाने लूना २५ ही मोहीम हाती घेतली होती. परंतु, रशियाच्या यानात काही तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांची ही चांद्रमोहीम अपयशी ठरली. त्यापाठोपाठ भारताची चांद्रमोहीम सुरू होती. त्यामुळे भारताच्या मोहिमेबद्दल लोकांच्या मनात धाकधूक होती. परंतु, ही मोहीम यशस्वी होईल असा विश्वास इस्रोने व्यक्त केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताची चांद्रयान-२ मोहीम अपयशी ठरली होती. त्यामुळे या मोहिमेकडून भारतीयांना आणि इस्रोच्या वैज्ञानिकांना खूप अपेक्षा होत्या. आम्ही चांद्रयान २ च्या अपयशातून खूप काही शिकलो आहोत असं इस्रोच्या वैज्ञानिकांनी म्हटलं होतं. इस्रोचे वैज्ञानिक जसं बोलले होते, तेच त्यांनी करून दाखवलं. भारताचे वैज्ञानिक त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासावर खरे उतरले असून त्यांनी चांद्रयान ३ चं चंद्रावर यशस्वी लँडिंग केलं आहे.

इस्रोने चांद्रयान मोहीम राबवली तेव्हा के. सिवन हे इस्रोचे प्रमुख होते. ही मोहीम अपयशी ठरली तेव्हा के. सिवन यांना रडू कोसळलं होतं. सिवन यांचं रडणं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मिठी मारून सावरणं, धीर देणं, तो क्षण भारतीय नागरिक विसरले नाहीत. इस्रोने त्याच अपयशातून वाट काढून नवी चांद्रमोहीम यशस्वी करून दाखवली आहे. सिवन हे आता निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी एस. सोमनाथ हे इस्रोचे अध्यक्ष आहेत.

हे ही वाचा >> Chandrayaan 3 : मोहिमेवरील खर्च किती? लँडिंगनंतर पुढे काय? जाणून घ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं

दरम्यान, इस्रोच्या चांद्रयान-३ मोहिमेचं यश पाहून माजी इस्रोप्रमुख के. सिवन यांनी आनंद व्यक्त केला आहे. सिवन म्हणाले, अनेक वर्षांपासून आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो. या यशाबद्दल त्यांनी संपूर्ण देशाचं अभिनंदन केलं आहे. या मोहिमेला पाठिंबा दिल्याबद्दल सिवन यांनी सरकारचे आभार मानले आहेत. तसेच ते म्हणाले, हे केवळ इस्रोचं यश नसून संपूर्ण देशाचं यश आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrayaan 3 former isro chief sivan congratulates indian scientists asc
Show comments